नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव ग्रामपंचायतींपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत आहे. तीन विधानसभांमध्ये भाजपचे आमदार आहेत. खुद्द प्रदेेशाध्यक्षांचा हा मतदारसंघ आहे. तरीही प्रत्येक विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांना मोठा फटक बसला. रामटेक लोकसभेमध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील हिंगणा आणि कामठी या दोन मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. हिंगणा विधानसभेत समीर मेघे हे सलग दहा वर्षांपासून आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना सर्वाधिक १७ हजार ८६२ इतके मताधिक्य मिळाले.
कामठी मतदारसंघात भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार आहेत. मात्र, या मतदारसंघातही पारवे प्रत्येक फेरीत पिछाडीवर होते. रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशीष जयस्वाल असून त्यांच्या मतदारसंघात बर्वेचे मताधिक्य अन्य विधानसभांच्या तुलनेत कमी आहे. विशेष म्हणजे, रामटेकमध्ये दहा वर्षांपासून शिवसेनेचा खासदार होता. भाजप आणि शिवसेनेचे आमदारही या भागात सर्वाधिक आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी यासाठी बावनकुळे आधीपासूनच आग्रही होते. माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकची जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह धरला. त्यामुळे शेवटी ही जागा शिवसेनेला मिळाली. पारवेंना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी भाजपकडेच होती. मात्र पारवेंना एकाही विधानसभा क्षेत्रात यश मिळाले नाही.
हेही वाचा : “महाविकास आघाडी कारस्थान करून शकुनी नितीने जिंकली”, पराभवानंतर बावनकुळेंची टीका
बावनकुळेंच्या मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य
कामठीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तीनदा आमदार झाले. असे असतानाही या मतदारसंघात बर्वे यांना हिंगणा विधानसभेपाठोपाठ मताधिक्य मिळाले. १७,५३४ मतांनी बर्वेंनी या मतदारसंघातून आघाडी घेतल्याने बावनकुळेंसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
पारवेंची स्वत:च्या मतदारसंघातही पिछाडी
आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला. पारवे उमरेड विधानसभेचे आमदार होते. मात्र, याच मतदारसंघातून त्यांना १४ हजार ८७९ मतांनी पिछाडी बघावी लागली. त्यांना ८३ हजार २८९ तर बर्वेंना ९८ हजार १६८ मते मिळाली.
हेही वाचा : अमरावती: ‘त्यांनी’ चक्क स्मशानभूमीत सुरू केले उपोषण, एका उपोषणकर्त्याची प्रकृती….
विधानसभानिहाय मतदान
विधानसभा – श्यामकुमार बर्वे – राजू पारवे – अंतर
काटोल – ८१,२२५ – ७६,११७ – ५१०८
सावनेर – ९६,१९८ – ७९,५४९ – १६,६०९
हिंगणा – १,१३,४६८ – ९५,६०६ – १७,८६२
उमरेड – ९८,१६८ – ८३,२८९ – १४,८७९
कामठी- १,३६,२४२ – १,१८,८०६ – १७,५३४
रामटेक- ८६,५३३ – ८१,८६५ – ४६६८
एकूण – ६,११,८९४ – ५,३५,२३४ – ७६,६६०