नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना डावलून दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला उमेदवारी दिल्यास वेगळी चूल मांडू, असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक अमोर गुजर यांनी दिला आहे. खासदार तुमाने हे गुजर यांचे मामा आहेत. तुमानेंना तिकीट नकारल्यास मला उमेदवारी द्या, अशी मागणीही गुजर यांनी केली आहे.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रपरिषदेत गुजर म्हणाले, मी शिवसेनेत गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत आहे. उठावाच्या वेळीही आम्ही सोबत होतो. परंतु हल्ली काही लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना घेरून मनमानी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे गटातून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये क्षमता नसतांनाही त्यांना थेट मोठे पद दिले जाते. रामटेक लोकसभा मतदार संघातून कृपाल तुमाने यांना तिकिट डावलून इतरांना देण्याची चर्चा आहे. या गोंधळामुळे शिवसेनाच्या जिल्हा संघटक पदाचा राजीनामा मी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधितांना शुक्रवारीच ई-मेलवर पाठवला आहे. माझ्यासोबत पक्षातील बरेच वरिष्ठ पदाधिकारीही आहेत. त्याबाबत खासदार कृपाल तुमाने यांनाही कल्पना दिली आहे. दरम्यान रामटेक लोकसभा मतदार संघात बाहेरच्या पक्षातून आयात केलेले राजू पारवे वा इतरांना उमेदवारी देणे योग्य नाही. तसे झाल्यास पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक घेऊन वेगळा निर्णय घेतला जाईल. कृपाल तुमाने यांना उमेदवारी न दिल्यास मी स्वत: लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. उमेदवारी अर्जही आणला आहे. आमच्या विचारांच्या इतर पक्षासोबत जाण्याचाही इशारा त्यांनी पत्रपरिषदेत दिला.
हेही वाचा : चंद्रपूर : लोकसभेत काँग्रेस पक्षाला तिकीट वाटपाच्या वादाची पार्श्वभूमी, यंदाही अनपेक्षित धक्का!
दहा वर्षांत तरुणांना रोजगार नाही
नागपूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत गरजेनुसार तरुणांना रोजगार मिळाला नाही. एमआयडीसी, बुटीबोरीतील निम्याहून जास्त उद्योग बंद आहेत. येथे रामटेक लोकसभा मतदारसंघ परिसरात मुबलक कोळसा वीज, खनिजे उपलब्ध असतांना उद्योग विदर्भाच्या बाहेर गेल, असा आरोप अमोल गुजर यांनी केला. पत्रकारांनी गुजर यांना आपले मामा खासदार कृपाल तुमाने यांचे हे १० वर्षांचे अपयश नाही का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, तुमाने यांनी प्रयत्न केले. परंतु शासनाने ऐकले नाही.