नागपूर: आशीष आणि अमोल देशमुख हे रणजीत देशमुख यांची दोन मुले आहेत. रणजीत देशमुख सावनेर मतदारसंघातून दोनवेळा आमदार होते. ते मंत्री राहिलेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, नागपूरचे पालकमंत्री पद अशी अनेक पदे रणजीत देशमुखांनी भूषवली आहेत. रणजीत देशमुख काँग्रेसमधले मोठे प्रस्थ आहेत. पण, सध्या ते राजकारणापासून दूर आहेत. असे असले तरी सावनेर मतदारसंघात रणजीत देशमुखांना मानणारा ज्येष्ठ मतदारांचा वर्ग आहे. त्यांच्याच ताकदीवर आशीष आणि अमोल देशमुख सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आशीष देशमुख यांचे सख्खे भाऊ अमोल देशमुख यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बुधवारी पत्रकार परिषद घेत आशीष देशमुखांवर अनेक आरोप केले. राजकारणासाठी अस्थिर मानसिकता असल्याचा आरोपही अमोल यांनी केला. यावेळी सुनील केदार यांच्यावरही अमोल देशमुखांनी आरोप केले.
सावनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला
सावनेर विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. सावनेरमध्ये प्रामुख्याने कुणबी समाजाचे वर्चस्व आहे. त्यामुळेच या मतदारसंघात आधीपासून कुणबी उमेदवार निवडून आले. सावनेर विधानसभा मतदारसंघ १९६२ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण, १९९९ मध्ये या बालेकिल्ल्यावर भाजपला विजय मिळविण्यात यश आले होते. भाजपच्या देवराव असोले यांनी सुनील केदार जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते त्यांचा पराभव केला होता. पण, ही पाच वर्ष वगळता भाजपला या मतदारसंघात कधीही विजय मिळविता आला नाही. या मतदारसंघावर सुनील केदार यांचे एकहाती वर्चस्व आहे. सावनेर म्हणजेच सुनील केदार असे समीकरण असल्याचे येथे दिसते.
राजकारणासाठी अस्थिर मानसिकतेची काही उदाहरणे
- राहुल गांधींना नागपूरमधून निवडणूक लढवावी अशी शिफारसः राहुल गांधींनी नागपूरमधून निवडणूक लढवावी अशी कल्पना मांडली, ज्यामुळे नागपूरमधील स्थानिक नेत्यांच्या मतांचा आदर न करता निर्णय घेतल्याचे दिसून आले.
- २००९ मध्ये भाजपमध्ये उडीः रणजीतबाबूंचे काँग्रेसचे तिकीट निश्चित होत असताना वरुण गांधींशी भेट घेऊन भाजपमध्ये अचानक जाऊन निष्ठावंत नसल्याचे दाखविले.
- राजकीय संन्यास: २००९ च्या भाजप पराभवानंतर २०१३ पर्यंत राजकीय विश्रांती घेतली, राजकारणात सातत्य नसल्याचे दर्शविले.
- स्वतंत्र विदर्भ उपक्रमः स्वतंत्र विदर्भसाठी त्यांची भूमिका अस्थिर राहिली, हा मुद्दा केवळ सोयीचा असताना वापरला, सततचे प्रयत्न किंवा प्रामाणिकतेचे अभाव दिसून आला.
- भाजपने वापरलेः २०१४ मध्ये भाजपने त्यांना सावनेरऐवजी काटोलला पाठवून वापर केला.
- २०१७ मध्ये आमदारकीचा राजीनामाः शेतकऱ्यांच्या कारणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला, पण नंतर कोणतीही पाठपुरावा केल्याचे दिसून आलेनाही, ज्यामुळे त्यांच्या हेतूंवर शंका व्यक्त झाली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला.
- २०१९ मध्ये फडणवीसांविरुद्ध काँग्रेसमधून निवडणूकः काँग्रेसमध्ये प्रवेश करून फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढविली, पक्षांच्या मूल्यांपेक्षा त्यांच्या स्वकीयाच्या फायद्यांसाठी पक्ष बदलल्याचे दिसून आले.
- पक्षाविरोधी कार्यः नाना पटोले यांच्यावर आरोप करून त्यांनी जि. प. उमेदवारांना भाजपच्या बॅनरखाली पाठिंबा देऊन काँग्रेसमध्ये असूनही विरोधी कार्य केले.
- २०२४ मध्ये पुन्हा भाजप प्रवेश .