अकोला : नव्या वर्षात पहिल्या महिन्याच्या उत्तरार्धात दिवसा फक्त सूर्य आणि रात्री सर्व ग्रह एका बाजूला येणार आहेत. रात्रीच्या प्रारंभी व कृष्ण पक्षातील अंधाऱ्या वेळी हा अनोखा आकाश नजारा खूपच सुंदर व मनोवेधक असेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.आकाशातील ग्रह ताऱ्यांचा नजारा प्रत्येक मानवी जीवाला भुरळ घालतो. अवकाशात घडणारी एखादी अनोखी घटना खूप आकर्षक आणि दीर्घकाळ स्मरणात राहते. सूर्यमालेतील सर्व ग्रह स्वतःभोवती फिरत सूर्य प्रदक्षिणा करतांना आकाशात आयनिकवृत्त मार्गावरुन जातात. यालाच राशीचक्र म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वी स्वतःभोवती पश्चिम-पूर्व फिरल्याने सूर्य पूर्वेला व पश्चिमेस मावळताना दिसतो. प्रत्येक राशीच्या वाट्याला येणाऱ्या ३० अंशाचे भागात दिसणाऱ्या तारकांच्या कल्पक आकारावरून मेष ते मीन अशी बारा राशींची रचना प्रत्यक्ष आकाशात पाहता येते. प्रत्येक ग्रहाचा परिवलन व परिभ्रमण कालावधी वेगवेगळा असल्याने हा सर्व परिवार राशीचक्रात वेगवेगळ्या ठिकाणी असतो, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा…उत्तीर्ण उमेदवारांचे गुण जाहीर न केल्याने संशयाचे धुके; चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण

कोणताही ग्रह सूर्य सान्निध्यात येतो, तेव्हा त्या ग्रहाचे दर्शन होत नाही, यालाच ग्रह अस्त झाल्याचे समजतात. बुध आणि शूक्र या दोन अंतर्ग्रहाचे उदयास्त पूर्व किंवा पश्चिमेस होतात. बाकी ग्रह मात्र पूर्वेला उगवून पश्चिमेस मावळतात. नेहमी सर्वत्र विखुरलेले ग्रह दुर्मीळ वेळी एका बाजूला येतात. तशी स्थिती सध्या आकाशात दिसून येत आहे. यामध्येच पृथ्वीला सर्वात जवळ असलेला चंद्र सुद्धा २१ ते २६ जानेवारीला सामील होत असून या अनोख्या आणि अतीदुर्मीळ घटनेला अधिक महत्त्व आले आहे. ही स्थिती आकाश प्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी असून रात्रीच्या प्रारंभापासून पहाटेपर्यंत ग्रह दर्शनाचा लाभ सप्ताहभर घेता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

शुक्र व शनी पश्चिमेची शोभा वाढवणार

सद्यस्थितीत पश्चिमेची शोभा वाढविणारा शुक्र व शनी हे दोन्ही एकमेकांजवळ कुंभ राशीत, तर सर्वात मोठा गुरु ग्रह आणि सध्या पृथ्वीच्या जवळ आलेला लालसर रंगाचा मंगळ ग्रह पूर्व आकाशात तेजस्वी रुपात पाहता येईल. सोबत युरेनस व नेपच्यून दुर्बिणीतून बघता येतील. दिवसा आकाशात फक्त सूर्य आणि बाकी ग्रह रात्रीच्या आकाशात असतील. सर्व ग्रह आकाशात दर्शनार्थ सज्ज असून सर्वांनी अनोख्या आकाश नजाऱ्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In second half of january sun will be on one side by day and all planets at night ppd 88 sud 02