बुलढाणा : शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होणे सुरू झाले असून काही दिवसातच त्यांचे टक्कल पडत असल्याने तालुक्यात हाहाकार उडाला आहे. आरोग्य यंत्रनांनी सर्वेक्षण सुरु केले असले तरी या ‘टक्कल साथ’चे नेमके कारण काय याबद्दल यंत्रणाचं संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या विचित्र आणि अभूतपूर्व आजाराने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने खळबळ उडाली आहे. शेगाव तालुक्यातील प्रामुख्याने बोंडगाव, कालवड, हिंगणा, कठोरा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले. अनेक कुटुंबांना या ‘व्हायरस’ चा फटका बसत असल्याचे वृत्त आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमक झालं काय?

अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. यामुळे व वर नमूद गावासह तालुक्यातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चार गावातील अनेक व्यक्तींचे केस एकाएकी कमी होऊन गळून जात आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. सर्वेक्षण झाले आहे व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही कळवण्यात आले आहे. या आजारामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शंपुमुळे असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिक धास्तावले आहेत. शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना, निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेत या गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर घेण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर आजाराची माहिती दिली आहे.

हेही वाचा…ठाकूर बंधुंच्या निवासस्थानी ईडीचा छापा, ताडोबा ऑनलाइन बुकींग घोटाळ्यातील…

एका गावात पंधरा ते वीस रुग्ण

शेगाव तालुक्यातील गोंडगाव कालवळ व हिंगणा वैजनाथ या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण आढळून आले. एका गावात पंधरा ते वीस रुग्ण आतापर्यंत आढळून आल्याने तिन्ही गावांमधील जवळपास ६० रुग्ण केस गळतीचे निदर्शनास आले. शेगाव तालुका आरोग्य अधिकारी दीपाली भायेकर यांनी ही माहिती दिली. एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींचे केस गळून टक्कल होत आहे. तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले. तालुका आरोग्य विभागाकडून जिल्हा साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या प्रकाराबाबत कळवण्यात आले आहे.नेमका प्रकार का घडत आहे याचा आम्ही शोध घेत आहो, अशी माहितीही डॉक्टर भायेकर यांनी दिली. भोनगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन मागितले आहे. आरोग्य केंद्र अंतर्गत च्या कालवड गावात तेरा तर कठोरा गावात सात ‘रुग्ण ‘आढळून आले आहे. गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In shegaon taluka over 50 people in three villages are rapidly losing hair scm 61 sud 02