नागपूर: करोना नियंत्रणात आल्याने आता कुणीही करोना प्रतिबंधात्मक लस घ्यायला तयार नाही.त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मे २०२३ दरम्यान पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात लसीच्या तब्बल १ लाख १० हजार ५६० मात्रा (डोज) मुदतबाह्य झाल्याने वाया गेल्याचे पुढे आले आहे.पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये वाया गेलेल्या लसीच्या मात्रेमध्ये ‘कोवॅक्सिन’च्या ९४ हजार ९०० आणि ‘कोविशिल्ड’च्या १५ हजार ६६० अशा एकूण १ लाख १० हजार ५५६ मात्रांचा समावेश आहे. त्यातही सर्वाधिक मात्रा नागपूर जिल्ह्यात वाया गेल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात करोनाच्या सर्व लाटांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू नोंदवले गेले होते.करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यावर सुरुवातीला या लस घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांनी गर्दी केली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व त्यानंतर पोलीस, शासकीय कर्मचारी, वृद्ध, सहआजार असलेले रुग्ण व सर्वसामान्यांनाही लस उपलब्ध करण्यात आली होती.एवढ्या संख्येने करोना प्रतिबंधात्मक लस वाया गेल्याच्या वृत्ताला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.