नागपूर: विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चिकन गुनियाच्या रुग्णांची संख्या तब्बल सहा पटींनी वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार, नागपूर विभागात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात चिकन गुनियाचे ६ रुग्ण आढळले. यातील ४ रुग्ण नागपूर ग्रामीण तर २ रुग्ण नागपूर शहरातील होते. १ जानेवारी ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान नागपूर विभागात ४० चिकन गुनियाचे रुग्ण नोंदवले गेले.
नागपूर विभागात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक १३ रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी ९ रुग्ण नागपूर ग्रामीण तर ४ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. भंडारा जिल्ह्यात १, गोंदिया जिल्ह्यात २६ चिकन गुनियाग्रस्तांची नोंद झाली आहे. आवश्यक उपाय केल्याने स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा नागपुरातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने केला आहे.
लक्षण काय?
चिकन गुनियाच्या रुग्णांमध्ये सलग दोन-तीन दिवस ताप, डोकेदुखी असते. अंगावर विशेषतः पाठ, पोट, कंबर या भागांवर पुरळ येते आणि सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुद्धा वेदनाकारक वाटते.
रुग्णसंख्येची स्थिती
जिल्हा – शहर | २०२२ | २०२३ (६ नोव्हें.पर्यंत) |
नागपूर (ग्रा.) | ०४ | ०९ |
नागपूर (श.) | ०२ | ०४ |
वर्धा | ०० | ०० |
भंडारा | ०० | ०१ |
गोंदिया | ०० | २६ |
चंद्रपूर (ग्रा.) | ०० | ०० |
चंद्रपूर (श.) | ०० | ०० |
गडचिरोली | ०० | ०० |
एकूण | ०६ | ४० |