नागपूर : बाजारगावजवळील चाकडोहमध्ये असलेल्या सोलर एक्सप्लोसीव्ह कंपनीत आरडीएक्सच्या स्फोटात ९ कामगारांच्या मृतदेहांचे चिंधड्या झाल्या होत्या. त्या मांसाच्या तुकड्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. सर्वच मृतदेहांची ओळख पटल्यामुळे अखेर मासांच्या तुकड्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी नागपुरातील मोक्षधाम घाटावरच नातेवाईकांच्या संमतीने अंत्यविधी पार पडला.
सत्यनारायण नंदलाल नुवाल यांच्या बाजारगावातील सोलर कंपनीत १७ डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता आरडीएक्स पावडरचे पँकिंग करीत असताना स्फोट झाला. या स्फोटात युवराज किशनजी घारोडे (बाजारगाव), ओमेश्वर किशनलाल मच्छिर्के (चाकडोह), मोसम राजकुमार पटले (पाचगाव-जि. भंडारा), मिता प्रमोद उईके (अंबाजडा-सोनक), आरती निलकंठ सहारे (कामठी), श्वेताली दामोदर मारबते (कन्नमवार ग्राम), पुष्पा श्रीरामजी मानापुरे (शिराळा), भाग्यश्री सुधाकर लोणारे (भूजतुकुम-ब्रम्हपुरी) आणि रुमिता विलास उईके (ढगा) या कागारांचा मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की उंच इमारती पूर्णपणे ढासळली. त्याखाली गंभीररित्या भाजलेले चार मृतदेह आणि स्फोटात तुकडे-तुकडे झालेले मांसाचे तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले. नऊही मृत कामगारांची ओळख पटविणे शक्य नसल्यामुळे ग्रामिण पोलिसांनी मांसाचे तुकडे जमा करून न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले. शेवटी पाच दिवसांनंतर डीएनए चाचणी पूर्ण करण्यात आली. अहवाल प्राप्त होताच डॉक्टरांनी मांसाचे तुकड्यांनी भरलेल्या पिशव्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या. मृतांच्या सर्व नातेवाईकांनी सर्वसंमतीने नागपुरातील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
हेही वाचा… चंद्रपूर : विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू; शिकारीच्या उद्देशाने…
मांसाचे तुकडे पाहताच नातेवाईकांचा आक्रोश
स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे कामगारांच्या मृतदेहाच्या मांसाच्या तुकड्यांना मोक्षधाम घाटावर आणण्यात आला. तेथे ९ मृत कामगारांचे जवळपास २०० पेक्षा जास्त नातेवाईक उपस्थित होते. मृतांमध्ये असलेल्या महिलांची चिमुकली मुली-मुलेसुद्धा उपस्थित होती. मांसाचे तुकड्यांच्या पिशव्या मोक्षधाम घाटावर पोहचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. चिमुकल्यांनी आई गमावल्याची जाणीव झाल्यानंतर धाय मोकलून रडणे सुरु केले. आजी-आजोबांच्या कुशीत मुंडके कोंबून रडत होते. या सर्व भावनिक प्रसंगाला पोलीस साक्षी होते. मुलांचा आक्रोश बघून त्यांचेही नकळत डोळे पाणावले होते.