नागपूर: प्रतिबंधात्मक उपाययोजनेनंतरही राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजाराने दहा जणांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारातून हा तपशील समोर आला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू अतिसारामुळे झाले.
शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करून जलजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाय राबवले जातात. त्यानंतरही या आजाराने मृत्यू होत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान काॅलराचे २१५ रुग्ण आढळले. त्यापैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. अतिसाराची ३ लाख ८ हजार ३८९ जणांना लागण झाली. त्यापैकी ६ रुग्णांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोची २४ हजार ७८९ रुग्णांना लागण होऊन त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा… अस्तित्वहीन ‘शकुंतला’ रेल्वेचा वाढदिवस साजरा, दिव्यांची आरास…
विषमज्वराचे ३९ हजार ७७ रुग्ण आढळले. परंतु एकही मृत्यू नाही. कावीळची २ हजार ८०५ जणांना लागण होऊन त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. राज्यात जलजन्य आजार संवर्गातील एकूण ३ लाख ७५ हजार २७५ रुग्णांची नोंद झाली. उपचारादरम्यान १४ रुग्णांचा मृत्यू झाला. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान मागच्या वर्षी राज्यात ३ लाख ९४ हजार ७२३ जणांना जलजन्य आजार झाले. तरी एकाच मृत्यूची नोंद झाली. २०२२ मध्ये ३ लाख ९६ हजार ५९७ रुग्णांपैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.
मृतांमध्ये चार लहान मुले
जलजन्य आजाराने दगावणाऱ्यांमध्ये धाराशिव येथील ३ वर्षीय मुलगा, रायगडमधील १२ वर्षीय मुलगी, जळगावमधील १० वर्षीय मुलगा, जळगावमधील १२ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. बुलढाणातील १७ वर्षीय मुलगी, अमरावतीतील २५ ते ३० वयोगटातील तीन रुग्ण, साताऱ्यातील ७० वर्षीय वृद्धासह इतरही काही रुग्णांचा जलजन्य आजाराने मृत्यू झाला.
हे ही वाचा… करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
जलजन्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय..
आरोग्य चांगले राहावे म्हणून आजारांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जलजन्य आजार टाळण्याबाबतच्या उपायाबाबत आपण जाणून घेऊ या. त्यानुसार पाणी उकळून प्यावे. यामुळे बहुतेक रोगजनकांचा नाश होतो, ज्यामुळे पाणी पिण्यास सुरक्षित होते. फिल्टरचे पाणी वापरल्याने पिण्याच्या पाण्यातील दूषित घटक काढून टाकण्यास मदत होऊ शकते. प्रत्येकाने साबण आणि पाण्याने हात व्यवस्थित धुतल्यास रोगजनकांचा प्रसार रोखता येतो. घर- परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट सुनिश्चित करणे आणि उघड्यावर शौचास जाणे टाळणे आवश्यक आहे. दूषित पाण्यात पोहणे किंवा आंघोळ करण्यापासून दूर राहिल्यास संभावित आजार टाळता येतात.