नागपूर : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांसह रत्नागिरी, पालघर आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने “रेड अलर्ट” दिला आहे. हवामान खात्याने राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता आहे. ” रेड अलर्ट” असलेल्या जिल्ह्यांतील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून बहुतांश रस्ते वाहतुकीस बंद आहेत.
हेही वाचा… एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चंद्रपूर जलमय
हेही वाचा… यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा रौद्रवतार; शहरातील अनेक भागात पाणी साचले
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थी यांना घरी जाण्यास अडथळा निर्माण होवू नये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता सर्व अंगणवाड्या तसेच सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.