लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यात ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी नोंदवण्यात आली आहे. राज्यात हिवाळ्यात थंडीमुळे विजेची मागणी कमी होते. परंतु यंदा थंडीत शनिवार ११ जानेवारी २०२४ रोजी राज्यात २५ हजार ८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. दरम्यान महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण करण्यात आली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे उच्चांकी मागणीनुसार महावितरणला यंदा वीज पुरवठा करता आला. महावितरणकडे मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याची जबाबदारी आहे. महावितरणकडे शनिवारी २५ हजार ८०८ मेगावॅटची वीज मागणी नोंदविली गेली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५ हजार ४१० मेगावॅट तर १४ एप्रिल २०२२ रोजी २५ हजार १४४ मेगावॅट अशी उच्चांकी वीजमागणी नोंदविली गेली होती. या मोसमात पाऊस चांगला झाला असल्याने कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढली असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

आणखी वाचा-अकोला : सावधान! नायलॉन मांजामुळे महिलेचा पाय कापला; तब्बल ४५ टाके…

विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीज खरेदी करार केले होते. त्यानुसार शनिवारची उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली. महानिर्मितीकडून ६ हजार ९९६ मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पांकडून ५ हजार २५२ मेगावॅट तर खासगी प्रकल्पांकडून ५ हजार ७३३ मेगावॅट वीज उपलब्ध करण्यात आली. याखेरीज जलविद्युत प्रकल्पांमधून २ हजार ९ मेगावॅट, सौर उर्जा प्रकल्पांमधून ३ हजार ९३ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांमधून २२८ मेगावॅट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पांमधून २ हजार ४९८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. आगामी उन्हाळ्याच्या हंगामात विजेच्या मागणीत संभाव्य वाढ लक्षात घेऊन महावितरणने ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी नियोजन केले आहे.

आणखी वाचा-‘नथुराम गोडसे’ला असांसदीय शब्दांच्या यादीतून वगळा… संघ भूमीतून…

कोणत्या कंपनीकडून वीज पुरवठा?

राज्यात महावितरणला सर्वाधिक वीज पुरवठा महानिर्मितीकडून केला जातो. महानिर्मितीकडून सर्वाधिक वीज निर्मिती औष्णिक वीज निर्मितून केंद्रातून केली जाते. तर महानिर्मितीच्या जलविद्युत, उसन गॅस, सौर ऊर्जेद्वाराही वीज निर्मिती केली जाते. सोबत महावितरणकडून लघु व दीर्घकालीन कराराद्वारे अदानी, जिंदलसह इतरही काही खासगी वीज निर्मिती कंपनीकडून वीज घेतली जाते.

Story img Loader