बुलढाणा: होय! तुम्ही म्हणाल काय चेष्टा करताय राव? पण हे पाणीदार सत्य आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील बाणगंगा नदीला पूर आला असून सध्या ही नदी दुथडी भरून वाहत आहे.बाणगंगा नदीवरील पुलावर बघ्यांची तोबा गर्दी उसळली असून येणारी जाणारी वाहने थांबवून लोक निसर्गाची ही कमाल आणि पुराचा नजारा डोळ्यात, मनात अन् मोबाईलमध्ये कैद करीत आहे.
बुलढाणा तालुक्यातील धाड परिसराला काल आणि आज, शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही दुपारी किरकोळ गारपीटसह धुवांधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बाणगंगा नदीला पूर आला आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत असून पाण्याचा आवेग, खळखळाट, नदीचे रौद्ररूप सारंच काही चक्रावून टाकणारे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग या पुरावर लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले.