नागपूर : वाघांचे शिकार करण्याचे एक कसब असते. त्या शिकारीवर इतर वाघांनी किंवा इतर मांसभक्षी प्राण्यांनी ताव मारू नये म्हणून ती लपवण्याचेही एक कसब असते. मात्र, अवघ्या जगभरात प्रसिद्ध झालेल्या “नयनतारा” या वाघिणीने चक्क आपल्या भावांपासूनच शिकार लपवली. तिने केलेली शिकार ती पाण्यात घेऊन जातांनाचा हा क्षण वन्यजीव छायाचित्रकार रुद्रा सावजी यांनी अप्रतिम टिपला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी हीच निळ्या डोळ्यांची “नयनतारा” वाघीण पाण्यातून प्लास्टिकची बाटली काढून ती तोंडात पकडून बाहेर घेऊन जातांना दिसली. वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केलेला हा व्हिडीओ जगभरात पोहोचला. त्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली. तीच “नयनतारा” ही वाघीण आता तिने केलेली शिकार पाण्यात लपवताना दिसून आली.
“नयनतारा” चा भाऊ “भोला” आणि “शिवा” या दोन्ही वाघांनी तिने केलेल्या शिकारीवर ताव मारू नये म्हणून ती शिकार त्यांच्यापासून लपवत होती. “भोला” आणि “शिवा” हे दोन्ही वाघ झोपले असल्याची खात्री “नयनतारा” या वाघिणीने करून घेतली आणि मग ती गुपचूप तिने केलेल्या शिकारीच्या दिशेने आली. हा प्रसंग वन्यजीव छायाचित्रकार रुद्रा सावजी यांनी अप्रतिम टिपला आहे.