नागपूर : आई म्हणजे, मायेची पाखरण करणारी मातृत्वाची मूर्ती. पण, संकटसमयी तीच आई धैर्य, शौर्यासह लढाईला सज्ज होते आणि आपल्या अंगभूत सामर्थ्याने शत्रूला पळता भूई थोडी करते. असेच एक उदाहरण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात नुकतेच बघायला मिळाले. वाघ घास घेऊ पाहणाऱ्या आपल्या लाडक्या पिल्लाला वाचवण्यासाठी मादी अस्वल थेट वाघाशी भिडले. बराचवेळ चाललेल्या या लढाईत अखेर त्या मादी अस्वलातील मातृत्त्व जिंकले आणि वाघाला माघार घ्यावी लागली. वाघाच्या तावडीत सापडलेले सावज त्याने सोडल्याच्या घटना तशा फारच दुर्मिळ. एकदा सावज टप्प्यात आले तर वाघ माघार घेत नाही. मात्र, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाला माघार घ्यावी लागली. त्याने अस्वलाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी त्या पिल्लाची आई समोर आली आणि तिने पिल्लासाठी वाघाशी थेट लढाई सुरू केली. हा संघर्ष बराचवेळ चालला. मादी अस्वलाने अतिशय धैर्याने वाघाचा सामना केला.

हेही वाचा : Video: यवतमाळ-दारव्हा मार्गावर व्याघ्र दर्शन, तीन जनावरांचा फडशा

या लढाईत हे मादी अस्वल मागे हटण्यास तयार नव्हते. त्याचवेळी पिल्लू त्या मादी अस्वलाच्या पाठीशी होते आणि जणू आईला लढायचे बळ पुरवत होते. आपली आई आपल्याला वाघापासून वाचवेल हा विश्वास त्या पिल्लाच्या डोळ्यात स्पष्ट दिसून येत होता. सुरुवातीला, वाघाने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण ताकडीने तो अस्वलाशी भिडला, पण प्रत्येकवेळी अस्वलाने त्याला मागे टाकले. शेवटी वाघाने या लढाईत माघार पत्करली, पण तो पुन्हा येण्याची शक्यता असल्याने अस्वलाने वाघाचा पाठलाग केला. मादी अस्वलाचा तो आवेश पाहून शेवटी वाघाला पळता भूई थोडी झाली. आपल्या बाळाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर माता किती निर्भय होते, हे या चित्रफितीतून दिसून आले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या अलीझंझा, निमढेला परिसरात आपले साम्राज्य उभारणारा ‘छोटा मटका’ म्हणजेच हा वाघ होता. वाघ सहजासहजी आपली शिकार सोडत नाही आणि ‘छोटा मटका’ सारख्या आक्रमक वाघाकडून तर ही अपेक्षाच नाही. मात्र, आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी या मादी अस्वलाने ‘छोटा मटका’ला देखील नमवले.

Story img Loader