नागपूर : अवकाळी पावसाचा मारा अधूनमधून सुरूच असला तरी उकाडा मात्र कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्यानंतर अवकाळी पावसामुळे जमीन काही थंड झालेली नाही. माणसांना कुलर किंवा एअरकंडिशनचा आधार घेता येतो, पण “त्या” वन्यजीवांचे काय? त्यांना पाणवठ्यचाच आधार. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या केसलाघाट बफर क्षेत्रात वाघीण आणि तिच्या बछड्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी यांनी हा सुंदर व्हिडिओ चित्रित केला आहे.
हेही वाचा : नागपूरचा चिंचभवन रेल्वे उड्डाणपूल ठरतोय अपघातप्रवण स्थळ, सुसाट वाहनांमुळे धोका वाढला; क्रॉसिंगमुळे…
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात उन्हाळा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. पाणवठ्यावर त्यांना असंख्य प्राण्यांचे दर्शन होते, पण पाणवठ्यावर असलेला वाघ पाहणे म्हणजे जरा मोठीच पर्वणी. ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “के मार्क” या वाघिणीला न ओळखणारे असे नाहीतच. ताडोबात ती पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. ती तिच्या दोन बचड्यांसह फिरताना नेहमीच दिसून येते. ताडोबातील वाघीण “माधुरी” आणि “खली” या वाघाची मुलगी म्हणजे “के मार्क”. आता ती सुद्धा तीन बछड्यांची आई झाली असून कायम त्यांच्यासोबत फिरताना पर्यटकांना दिसून येते. ताडोबाच्या केसलाघाट पर्वतरांगाभोवती तिचे अस्तित्व असते. या धाडसी आणि सुंदर वाघिणीने दक्षिण ताडोबाच्या केसलाघाट आणि झारी पेठ जंगलावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे. “के मार्क” ही वाघीण अतिशय जोखमीच्या भागात राहते.
या वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग जातो. तिला हिवाळ्यात अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना आणि अनेक वेळा लांबच लांब चालताना पाहिले आहे. अलीकडे तिच्या या पाणवठ्यातील व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.