नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले होते. आता बफरक्षेत्रातसुद्धा पर्यटकांची तेवढीच गर्दी वाढू लागली आहे. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रत्येक करामती वन्यजीव छायाचित्रकारांमुळे पर्यटकांसमोर येत असतानाच आता या बफर क्षेत्राचा राजा असणाऱ्या ‘छोटा मटका’ने मात्र पर्यटकांना चिंतेत टाकले आहे.
वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार अभिषेक सिंग यांना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट ‘छोटा मटका’ लंगडताना आढळून आला. दोन महिन्यांपूर्वी धिप्पाड शरीरयष्टीचा ‘बजरंग’ आणि ‘छोटा मटका’ या दोन वाघांत जोरदार झुंज झाली. दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या या झुंजीचे अनेक पर्यटक साक्षीदार होते. अक्षरश: अंगावर काटा आणणाऱ्या या झुंजीत ‘बजरंग’ वाघ मृत्युमुखी पडला. आजवर झालेल्या झुंजीत तो कधीही पराभूत झाला नव्हता, पण ‘छोटा मटका’ने त्याला थेट यमसदनी धाडले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातीलच ‘मोठा मटका’ या वाघाचा हा लहान मुलगा. या ‘छोटा मटका’ने ताडोबाच्या बफर क्षेत्रात आपले साम्राज्य उभारले.
हेही वाचा : “वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा”; रविना टंडन म्हणते, “जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन…”
धिप्पाड शरीरयष्टी आणि आक्रमक असलेल्या ‘छोटा मटका’ने बैलाची शिकार केली. त्या शिकारीवर हक्क दाखवण्यासाठी ‘बजरंग’ आला आणि त्याचवेळी या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात ‘बजरंग’ला जीव गमवावा लागला तर ‘छोटा मटका’ गंभीर जखमी झाला. त्याला शोधण्यासाठी वनखात्याची १४ जणांची चमू जंगलात गेली. त्यानंतर तो नवेगाव परिसरात लावण्यात आलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये आढळला. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत तो कुणालाही दिसून आला नाही. मात्र, आता दोन महिन्यानंतर तो वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार अभिषेक सिंग यांना दिसला. ‘छोटा मटका’च्या चालीतला तो दरारा बराच कमी झाला होता.
एवढेच नाही तर तो लंगडत चालत होता. त्याच्या हातावर आणि पायावर जखमा आढळून आल्या. ‘बजरंग’ आणि ‘छोटा मटका’ यांच्यातील झुंजच एवढी थरारक होती की, एकाला जीव गमवावा लागला. तर दुसरा जीव जाता जाता वाचला. मात्र, ‘छोटा मटका’ जीवंत असण्याचेच समाधान वन्यजीव पर्यटकांना होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राच्या या अनभिषिक्त सम्राटाला पाहून पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.