नागपूर : वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे. पुन्हा एकदा या व्याघ्रप्रकल्पातील वाघाचा वन मजुरांच्या कपड्याशी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने ताडोबातील एकूणच व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधितज्ज्ञ आशिष मुंधडा यांनी हा व्हिडिओ चित्रित केला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वनमजुराने त्याचे कपडे झाडावर अडकवून ठेवले होते. वणवाप्रतिबंधक आणि इतर कामे याठिकाणी सुरू आहेत आणि हे काम करणाऱ्या एक मजुराने त्याची लुंगी झाडावर उंच अडकवून ठेवलेली होती.
“ज्युनिअर बजरंग” आणि बछड्याला ते दिसले. वयात येऊ पाहणाऱ्या या बछड्याला त्याचे कुतूहल वाटले. तो झाडावर चढून ती लुंगी मिळवण्यासाठी धडपड करू लागला. एक-दोनदा त्याचे प्रयत्न फसले, पण नंतर तो झाडावर चढण्यात यशस्वी ठरला आणि त्याने ती लुंगी मिळवली. खाली येताच तो त्या कापड्यांशी खेळू लागला.
यापूर्वी देखील वाघ मजूराच्या कपड्याशी खेळताना आढळला. यापूर्वी देखील वाघ पाण्याच्या प्लास्टिक बाटलीसोबत खेळताना आढळला. तर काही वर्षांपूर्वी वाघाने वनमजुरांचा डबा देखील पळवला होता. तर अलीकडेच वाघाच्या तोंडात पर्यटकांच्या कॅमेऱ्याची पिशवी देखील आढळून आली होती. प्रशासनाने प्लास्टिक व कचरामुक्त व्याघ्रप्रकल्प ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पर्यटकांचा ओघ अधिक असलेल्या या व्याघ्रप्रकल्पात कधी प्लास्टिक बाटल्या तर कधी प्लास्टिकचे वेष्टण आढळतच आहेत.
मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. मुंबई येथील डॉक्टर राहुल महादार यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२० मध्ये जुनाबाई’ वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना आढळून आले, जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटली उचलतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर आले होते, बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढाही इकडेच आहे.
निमढेला बफर क्षेत्रात भानूसिखडी’ या वाघिणीचे सुमारे १५ महिन्यांचे तीन बछडे रबरी बुटांशी खेळताना वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार संदीप गुजर यांना दिसून आले होते. तर पाण्यातून प्लास्टिकची बाटली बाहेर काढणाऱ्या वाघाच्या दीप काठीकार यांनी चित्रित केलेल्या व्हिडिओची दखल थेट पंतप्रधानांनी घेतली होती.