लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूर विभागाने यंदा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गतही भरारी पथके नेमण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यातील कॉपीची प्रकरणे पकडण्यात आली होती. यात गोंदिया जिल्हा अव्वल होता. भाषा विषयाच्या पेपरमध्ये सात कॉपीची प्रकरणे एकट्या गोंदिया जिल्ह्यामध्ये होती. याचाच परिणाम की काय नागपूर विभागाच्या निकालात कॉपीबहाद्दर गोंदिया जिल्हा ९३.४३ टक्क्यांनी विभागात अव्व्ल ठरला आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये विभागातून १ लाख ५३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५२ हजार १२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३७ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९०.३५ इतकी आहे. विशेष म्हणजे, करोनामुळे दोन वर्षे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मागील वर्षीपर्यंत नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, यंदा सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे.
हेही वाचा… ‘मंदिर,मशीद,चर्च’च्या वीज दराबाबत व्हायरल पोस्ट खरी की खोटी?; महावितरणचा दावा काय?,जाणून घ्या सत्य…
नागपूर विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९२.०१ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.६९ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ८२.९३ टक्के लागला आहे.