गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रक्रिया एप्रिल २०२३ मध्ये करण्यात आली असून, त्याची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. या यादीत निवड झालेले अनेक विद्यार्थी शहरी भागातील आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपण ग्रामीण भागात येत असल्याची खोटी माहिती प्रशासनाला देऊन प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यायग्रस्त पालकांनी जिल्हाधिकारी, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे बुधवारी लेखी तक्रार दाखल केली आहे.
शहरी व ग्रामीण विद्यार्थी यावर संभ्रम दूर करण्यासाठी नवोदय विद्यालय नवेगावबांध येथील प्राचार्यांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांना पत्र पाठवून खुलासा मागवला होता. परंतु, शहरी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक यांनी निवड चाचणी आवेदन भरताना या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात येत असल्याचे दाखवले आहे. या मुख्याध्यापकांनी तिसरी, चाैथी, पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात येत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
हेही वाचा… गोंदिया : चालकाचा ताबा सुटला अन् वाहन शेतात कोसळले, अपघातात ३३ महिला जखमी
काही विद्यार्थ्यांनी शहरी भागातील खासगी काॅन्व्हेंट, शाळेत तिसरी व चाैथीमध्ये शिक्षण घेतले असून, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून त्यांची नावे ग्रामीण भागातील शाळेत पाचव्या वर्गात दाखल करण्यात आली. ग्रामीण भागात शिकत असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. नियमानुसार तिसरी, चाैथी, पाचवीचे शिक्षण ग्रामीण भागातील शाळेत होणे आवश्यक आहे. पण खोटे दाखले देत ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले. त्यामुळे अनेक शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण असल्याचा फायदा घेतलेला आहे.
हेही वाचा… आर्थिक मागास महामंडळास मुंबईत जागा नाही; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत
दरम्यान, प्रशासनाची दिशाभूल करत नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात यावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी तक्रार ग्रामीण भागातील पालकांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक व नवोदय विद्यालय नवेगावबांध येथील प्राचार्यांकडे केली आहे.