नागपूर : पावसाळा जवळजवळ संपल्यातच जमा आहे आणि सगळीकडे हिरवळ पसरली आहे. अशावेळी जंगलातल्या रस्त्यालगतच्या हिरवळीवर वाघाने ठाण मांडले असेल तर ! ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात ‘छोटा दडीयल’ने चक्क ठाण मांडले. एवढेच नाही तर कधी या कानाला, कधी त्या कानाला, कधी दाढीला खाजवत तो त्याच ठिकाणी बसून राहिला. ‘छोटा दडीयल’च्या या करामती वन्यजीवप्रेमी अरविंद बंडा यांनी कॅमेऱ्यात टिपल्या.

अवघ्या पाच वर्षांचा ‘छोटा दडीयल’ अतिशय देखणा आहे, त्याच्या चेहऱ्याभोवती असलेल्या दाढीसारख्या दिसणाऱ्या केसांमुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. पण, त्याचबरोबर त्याचा रुद्रावतार देखील पर्यटकांनी अनुभवला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सिरकडा बफर क्षेत्रात ‘पाटलीनबाई’ नावाची वाघीण आणि ‘दडीयल’ यांचा बछडा असलेला ‘छोटा दडीयल’ २०१९ मध्ये जन्माला आला. पळसगावमार्गे मोहर्लीच्या जंगलामध्ये साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्याने आपला अधिवास तयार केला. सुरुवातीच्या काळात त्याला ‘भीम’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, ‘दडीयल’प्रमाणे त्याला गळ्याभोवती व मानेभोवती केस (दाढी) येऊ लागले. यावरून त्याचे नामकरण ‘छोटा दढीयल’ असे झाले.

हेही वाचा – गडकरींचे खाद्य प्रेम अन् पाटोडी विक्रेत्यांची सोय

सुरुवातीला अधिवासासाठी त्याची ‘बजरंग’ या वाघासोबत लढाई झाली. ‘छोटा दडीयल’ने त्याला या लढाईत हरवले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खातोडापासून मोहर्लीतील तेलिया, जामुनझोरा या भागावर ‘छोटा दढीयल’ने त्याचे साम्राज्य निर्माण केले. मोहर्ली गावाच्या जवळच असणाऱ्या तलावाच्या परिसरातील अनेकदा पर्यटकांना ‘छोटा दडीयल’ ने त्याच्या करामती दाखवल्या आहेत. पर्यटकांना त्याने कधी निराश केले नाही.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दक्षिणेकडे असणाऱ्या भूभागात आता ‘छोटा दढीयल’चे त्याचे साम्राज्य स्थापन केले आहे. कित्येकदा तो मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात, ताडोबाकडे जाणाच्या मुख्य डांबरी रस्तावर, कोंडगाव, सितारामपेठ याठिकाणीसुद्धा दिसतो. मात्र, जुनोना बफर क्षेत्र त्याचे हक्काचे ठिकाण आहे.

हेही वाचा – ‘यश हवे तर आत्मपरीक्षण करून स्वत:चे बलस्थान आणि उणिवा ओळखा’, उपजिल्हाधिकारी झालेल्या वैष्णवीचा सल्ला

मोहर्लीच्या काठावरील जंगलात अनेकांनी अनेक वाघ पाहिले आहेत. मात्र, तलावाकाठच्या गवतात राहून आपले अस्तित्व निर्माण करणारा वाघ केवळ ‘छोटा दडीयल’ हाच आहे.