लोकसत्ता टीम
अकोला : सोयाबीन, हरभरा यासह शेतमालाचे भाव घसरले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत नाफेडणेही अद्यापपर्यंत हरभऱ्याची नोंदणी सुरू केली नाही. परिणामी, हमीभावापेक्षाही कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
सध्या देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी अनियमित पावसामुळे अगोदरच शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातच शेतमालाचे भाव पडल्याने तो चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आणखी वाचा-पारा चाळीशी पार…मात्र आता पडणार पाऊस; येत्या २४ तासात…
सुरुवातीला सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपेक्षावर गेले होते. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आले तेव्हा मात्र हा भाव सतत खाली आला. सध्या प्रतिक्विंटल चार हजार १०० रुपयांवर खाली आला आहे. परिणामी गेल्या वर्षीपासून भाव वाढण्याची वाट पाहणाऱ्या सोयाबीन उत्पादकांची चांगलीच अडचण झाली आहे. शासनाकडून दिला जाणारा सोयाबीनचा हमीभाव चार हजार ६०० रुपये आहे. मात्र यावर्षी या हमीभावाने सोयाबीनची खरेदी झाली नाही. खरेदीची तारीख संपतेवेळी फक्त औपचारिकता म्हणून काही भागात नाफेडतर्फे थोडी बहुत खरेदी करण्यात आली.
आणखी वाचा-नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
आता हरभऱ्याचीही तीच गत आहे. हरभऱ्याचे उत्पादन येण्यापूर्वी अकोला जिल्ह्यात हरभऱ्याचा भाव प्रतिक्विंटल सात हजार ३०० पर्यंत वर चढला होता. हरभरा बाजारात येताच हा भाव खाली खाली जात आता पाच हजारावर आला आहे. शासनाचा हरभऱ्याचा हमीभाव पाच हजार ४४० रुपये प्रति क्विंटल आहे. दरवर्षी नाफेडद्वारा फेब्रुवारी महिन्यात नोंदणी करून मार्च महिन्यापासून हरभऱ्याची खरेदी केल्या जाते. यावर्षी मात्र अद्याप नोंदणीलाही सुरुवात न झाल्याने नाफेडला हरभरा घ्यायचा आहे की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला. निवडणुकीच्या उत्सवात बळीराजाच्या अडचणीकडे कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे.