नागपूर: उपराजधानीतील सांडपाण्यात करोनाच्या विषाणूंबाबत सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या प्रयोगशाळेत जनुकीय संशोधन सुरू आहे. त्यात गेल्या सात महिन्यात येथे करोना विषाणूचे अंश आढळले नसल्याचे पुढे आले आहे.
सिम्सच्या प्रयोगशाळेत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत येथील संशोधक डॉ. राजपाल सिंग कश्यप म्हणाले, सिम्समध्ये २०२१ पासून सांडपाण्यात करोना विषाणूबाबत जनुकीय संशोधन सुरू आहे. त्यावेळी सांडपाण्यात करोनाचे विषाणू आढळल्याचे पुढे येऊन हा शोध प्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरही झाला होता. नवीन संशोधनासाठी गेल्या नऊ महिन्यात नागपूर शहर- ग्रामीणमधून १५०० सांडपाणी नमुने गोळा केले गेले.
हेही वाचा… नव्या प्रियकराच्या मदतीने जुन्याला संपविले; आलापल्ली हत्याकांडाचा उलगडा
सगळ्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता एकाही नमुन्यामध्ये करोनाचे अंश आढळले नाही. त्यामुळे नागपुरातील हा आजार नामशेष झाल्याचे निरीक्षण पुढे येत असल्याचे डॉ. कश्यप म्हणाले. या संशोधनात डॉ. तान्या मोनाघन, डॉ. अमित नायक, डॉ. अली अब्बास हुसेन, रिमा बिस्वास, हेमांगी दुदानी, सुश्रूत कुलकर्णी, अक्षता नंदनवार, पूजा लांजेवार यांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
उपराजधानीतील सांडपाण्यात आता करोनाचे विषाणू नसल्याचे अभ्यासातून पुढे आले. हा अभ्यास सुरू राहिल्यास विषाणूंची गुंतागुंत लक्षात घेत भविष्यातील साथीचा धोका टाळणे शक्य आहे. या उपक्रमासाठी शासनस्तरावर प्रयोगशाळेला संशोधनासाठी मदतीची गरज आहे. – डॉ. लोकेंद्र सिंग, संचालक, सिम्स रुग्णालय, नागपूर.