अमरावती : पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीला प्रति क्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारने तुरीवर साठा मर्यादा लागू केली असली, तरी भावात नरमाई दिसून आली नाही. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी यवतमाळच्‍या बाजारात तुरीला किमान ९ हजार ३०० तर कमाल १० हजार रुपये, वाशीमच्‍या बाजारात किमान ८ हजार ६५० आणि कमाल १० हजार रुपये दर मिळाला. मंगळवारी अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत २ हजार ३३१ क्विंटल तुरीची आवक झाली. कमाल ९ हजार ५५० तर कमाल उच्‍चांकी १० हजार ७०० रुपयांचा दर मिळाला. अकोला बाजार समितीत १ हजार ४४२ क्विंटल तुरीची आवक झाली आणि किमान ८ हजार तर कमाल १० हजार ३३५ रुपये भाव मिळाला.

हेही वाचा – विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून

तुरीचे उत्पादन घटल्याने मागणी वाढती आहे. त्यामुळे भावही दहा हजारांच्‍या वर झेपावले आहेत. तुरीचे दर वाढताच तूर डाळीलाही महागाईचा तडका बसला. मॉलमध्ये १५०, तर आता किराणा दुकानात १३५ रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात झालेली अतिवृष्टी व जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेला सततचा पाऊस आणि सर्वच तालुक्यांत सरासरी पार झालेल्या पावसामुळे तूर पिकावर मर रोग आला. सुमारे ५० टक्के क्षेत्रातील तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्या जागच्या जागी सुकल्या. त्यानंतर अतिथंडीने दवाळ जाऊन बहरातील तुरीचे शेंडे जळाले होते. त्यामुळे सरासरी उत्पादन घटले. सार्वत्रिक असेच चित्र असल्याने तुरीची आवक घटली व मागणी वाढायला लागली आहे. सरकारने साठा मर्यादा लागू केल्यानंतर तूर डाळीच्या भावात २०० रुपयांपर्यंत नरमाई आली होती. पण तुरीचे भाव कायम राहिले. तुरीचा सरासरी कमाल भाव १० हजार ७०० रुपयांवर आहे. तर किमान भाव आता ९ हजारांच्या पुढे गेले.

हेही वाचा – लोकजागर : ओबीसी नेमके कुणाकडे?

देशात तुरीचा पुरवठाच कमी असल्याने दरात पुढील काळातही तेजी राहू शकते, असा अंदाज आहे. आफ्रिकेतील देशांमधून सप्टेंबरपासून तुरीची आवक सुरू होईल. तोपर्यंत आवकेची गती कमी राहील. त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the market of west vidarbha the price of tur continues to rise mma 73 ssb