अकोला : आकाशात मे महिन्यात मनमोहक घडामोडींची पर्वणी लाभणार आहे. निरभ्र रात्री तीन ग्रह, दोन ग्रहाचा अस्त, उल्का वर्षाव आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र आदींच्या दर्शनाची मेजवानी उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणार आहे, अशी माहिती खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी दिली.
आकाश निरीक्षणाच्या छंदातून वेगळा आनंद मिळत असतो. तापमानाचे रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. सायंकाळी हवेतील गारव्यासोबतच आकाशातील विविध घडामोडी मनमोहक ठरतात. मेच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. हा ग्रह एका राशीत सुमारे एक वर्ष असतो.
हेही वाचा : एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत मोठी अपडेट, तारखा कधी जाहीर होणार? वाचा…
आजवर पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शुक्राचा अस्त ६ मे रोजी पूर्वेस, तर सर्वात मोठा गुरु ग्रहाचा अस्त ७ मे रोजी पश्चिमेस होईल. आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाच ग्रह सहज बघता येतील. चंद्रासोबत ग्रह ओळख अधिक सुलभ होते. ४ मेच्या पहाटे वलयांकित शनी ग्रह चंद्राच्यावर, तर ५ ला लालसर रंगाचा मंगळ ग्रह चंद्राचे अगदी जवळ आणि ६ ला सर्वात लहान असलेला बुध ग्रह चंद्रकोरी खाली पाहता येईल. ५ मे रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर कुंभ राशी समुहात दरताशी विविध रंगांच्या उल्का रात्री २ नंतर पडताना दिसतील.
पृथ्वीला सुमारे दीड तासात एक फेरी पूर्ण करणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र ९ मे रोजी रात्री ७.५७ ते ८.०३ या वेळी नैॠत्येकडून ईशान्य बाजूस जाताना फिरत्या चांदणी रूपात दिसेल. १० रोजी रात्री ७.०८ते ७.१३ या वेळी दक्षिण पूर्व आकाशात आणि दि.११ च्या पहाटे ४.५७ ते ५.०३ या वेळी वायव्य ते आग्नेय दिशेला, तर १३ च्या पहाटे ४.५४ते ५ वाजता वायव्य ते दक्षिणेकडे जाताना दिसेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. या अवकाशातील घडामोडींचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी मात्र नाही, कारण काय? जाणून घ्या
३ ते ३१ मेदरम्यान महाराष्ट्रभर अक्षवृत्तीय स्थितीनुसार शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येईल. याची सुरुवात दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जाईल. सूर्य नेमका डोक्यावर आल्याने आपली सावली काही वेळेसाठी नाहीशी होईल. ही घटना केवळ मकरवृत्त ते कर्कवृत्त या भागात घडून येते. भारतात रांची, भोपाळ या पट्ट्याच्या दक्षिण भागाकडे ही अनुभूती घेता येते, असे प्रभाकर दोड म्हणाले.