प्रशांत देशमुख
वर्धा : सध्याच्या राजकीय धामधुमीत नवनव्या घडामोडी घडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आमदारांना सतर्क केले आहे. १३ जुलैला भाजप आमदारांची एक बैठक बोलाविण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजपचे तीन विधानसभेचे व एक विधानपरिषदेचा असे चार आमदार आहेत. त्या सर्वांना ही सूचना आल्याची माहिती मिळाली. एका आमदाराने यास दुजोरा देत अधिक भाष्य करण्याचे टाळले.
बावनकुळेंचा निरोप काय?
अत्यंत गोपनीय असल्याने या बैठकीचे स्थळ पण सांगण्यात आले नाही. या दिवशी कुठेही जावू नका. स्थळ वेळेवर सांगण्यात येईल, असा बावनकुळे यांचा निरोप आहे. प्राप्त माहितीनुसार, पक्षातील नव्यांची एंट्री निष्ठावंत आमदारांना बोचू लागली आहे. प्रथम शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना व आता अजित पवार यांना सोबत घेत सत्तेत वाटेकरी करण्यात आले. त्यामुळे निधी, अन्य योजना, पदे त्यांनाही मिळणार, मग आम्ही काय करायचे, असा भाजप आमदारांना पडलेला प्रश्न आहे. तो वावगा कसा म्हणता येईल, असे एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणतो.
हेही वाचा >>>बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता
आमदारांमधील अस्वस्थतेची पक्षश्रेष्ठींकडून दखल
पक्षाच्या आमदारांमधील ही अस्वस्थता भाजप नेतृत्वाच्या कानी पडली अन् त्याची दखल घेत या खास बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्यांना भागीदार करत काय साध्य होणार, याचे उत्तर कदाचित या गोपनीय संभाव्य बैठकीत मिळू शकते.