लोकसत्ता टीम
नागपूर : बालभारतीने नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची छपाई केली आहे. यात इयत्ता सहावीच्या हिंदी विषयांच्या पुस्तकामध्ये छापण्यात आलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दा ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ असा शब्द प्रसिद्ध करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ‘एक्स’ माध्यमावर ही माहिती देत यावर आक्षेप घेतला आहे.
मागील काही वर्षांपासून शालेय अभ्यासक्रमामध्ये नवनवीन प्रयोग केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यात आता ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दा ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ शब्द वापरण्यात आल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. असाच आरोप याआधीही करण्यात आला होता. २०१६ मध्ये यावरून वाद झाला होता. उपरोक्त उल्लेखामुळे शिक्षणक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र, केंद्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली संविधानाची प्रस्तावना जशीच्या तशी पुस्तकांमध्ये छापली असल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.
आणखी वाचा-गडचिरोली : सट्टाबाजाराचा कौल भाजपच्या बाजूने तर सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीवर, धाकधूक वाढली…
बालभारतीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात धर्मनिरपेक्ष असा शब्द असून हिंदीच्या पुस्तकात पंथनिरपेक्ष, असा शब्द वापरण्यात आला आहे. हिंदीच्या पुस्तकामध्येही धर्मनिरपेक्ष शब्द का वापरण्यात आला नाही?, असा सवाल शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींकडून उपस्थित करण्यात आला होता. बालभारतीचे तत्कालीन संचालक सुनील मगर यांनी यावर खुलासा केला होता. बालभारतीकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे भाषांतर करण्यात आलेले नाही. ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार हा शब्द बदलण्यात आला असून बालभारतीच्या पुस्तकांमध्ये २०१३ पासून पंथनिरपेक्ष शब्द वापरला जात आहे. त्यावरून वाद होण्याचे कोणतेही कारण नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनीही एक्स माध्यमावरून यावर आक्षेप घेतला आहे.
अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता
राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे. याशिवाय मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या आरखड्यातही प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सूचवण्यात आले आहे. यावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून मनुस्मृती लागू करणार नसल्याचे सांगितले.