अमरावती : मेळघाटसारख्या दुर्गम भागात ५२ मतदान केंद्रांवर इंटरनेटचे नेटवर्क, मोबाइल कनेक्टिविटी नसल्याने तिथे निवडणुकीदरम्यान अडचण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून त्या ठिकाणी संपर्कासाठी वनविभागाच्या वॉकीटॉकी, मॅनपॅकसारख्या वायरलेस साधनांची व्यवस्था करण्यात येत आहे.
जिल्ह्यात इंटरनेट, मोबाईल नेटवर्क नसलेल्या (शॅडो) एकूण ७२ मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली होती. निवडणुकीच्या अनुषंगाने येथे नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी पत्राद्वारे मेळघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक साहाय्यक अधिकाऱ्यांकडून जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने बीएसएनएलकडे नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले. ७२ पैकी २० मतदान केंद्रांवर नेटवर्क उपलब्ध झाले असून, ५२ केंद्रांवर मात्र अद्याप नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यान व प्रामुख्याने मतदानाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडे मतदानाचा संपूर्ण अहवाल पाठविताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा – मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…
मेळघाटातील निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचा संपर्क जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसोबत होणेही आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने काही सूचना, निर्देश देणे शक्य होईल. या सर्व परिस्थितीचा विचार करता ज्या ५२ मतदान केंद्रांवर नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे वायरलेस साधनांचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर किमान दोन रनर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर काही अंतरावर नेटवर्क मिळेल, त्या ठिकाणी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना हे रनर मतदान केंद्रांवरील माहिती व्यक्तीशः जाऊन उपलब्ध संपर्क साधनांच्या मदतीने ती माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकणार आहेत.
हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा
मेळघाटातील सलिता, हिल्डा, खारी, कारजखेडा, मारीता, चोपन, रायपूर, सिमोरी, रंगुबेली, लाखेवाडा, माडीझडप, खोकमार, बुलुमगव्हाण, हटनादा, कारादा, कोटमी, खंडूखेडा, मालूर, पाटीया, चुनखडी यासह इतरही गावांतील एकूण ५२ मतदान केंद्रांचा समावेश शॅडो केंद्रांच्या यादीत करण्यात आला आहे.