रेशीमबाग मैदानात नागपूर मेगा ट्रेड फेअर हॅन्डलूम हॅन्डीक्राफ्ट एग्जिबिशन ॲन्ड ॲम्युजमेन्ट पार्कच्या नावावर मोठे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनीतील वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल झुल्यांनी नागरिकांना भुरळ घातली असून त्यावर मोठी गर्दी जमत आहे. परंतु, काही झुल्यांचे संचालन १८ वर्षांखालील मुले करतानाचे ‘व्हिडीओ’ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने झुला झुलणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.
सदर प्रदर्शन महिला स्वयंरोजगार संस्थांद्वारे करण्यात आले आहे. प्रदर्शनीत आकर्षक दिव्यांची माळ, अनेक खाद्यपदार्थाचे स्टॉल, विविध प्रकारचे खेळ, आकाशात उंचीवर जाणारे आकाश झुले, ड्रॅगन झुल्यांसह अनेक लहान-मोठे झुले आहेत.
हेही वाचा >>>नागपूर :पैसे देण्यासाठी चौकात बोलावले अन् मित्राने घात केला
झुल्यांचे मुलांना आकर्षण असल्याने त्यांच्यासह पालकही झुल्याचा येथे मोठ्या प्रमाणात आस्वाद घेताना दिसतात. त्यातच काही झुल्यांचे संचालन १८ वर्षांहून कमी वयाचे मुलेच करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समाज माध्यमांर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या मुलांना झुल्यांचे संचालन करण्याचे अधिकार आहे काय?, मुलांना झुला संचालन करण्याचे आवश्यक संचालन करण्यात आले काय?, मुले संचालन करणाऱ्या झुल्यांचा अपघात होऊन कुणी मुलगा वा पालक जखमी झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.हा गंभीर प्रकार असतानाही त्याकडे नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर शहर पोलिसांसह लोकप्रतिनिधींकडूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुबोध चहांदे यांनी केला.