नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ कधी पर्यटकांना निराश करत नाहीत. भल्या पहाटे पर्यटनाच्या पहिल्याच फेरीत व्याघ्रदर्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. ताडोबातील प्रत्येक वाघ हा आता जवळजवळ ‘सेलिब्रिटी’ झाला आहे. त्यामुळे दररोज त्यांच्या नवनव्या कथा पर्यटकांच्या नजरेतून लिहिल्या जात आहेत. ‘छोटा मटका’च्या कथा तर आणखीच उत्कंठावर्धक! गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव पर्यटन क्षेत्रात कार्यरत चिन्मय देशपांडे यांनी ‘छोटा मटका’चा कॅमेऱ्यात कैद केलेला असाच एक अनुभव ‘लोकसत्ता’शी सामाईक केला.
‘भल्या पहाटे आम्ही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आमची सफारी सुरु केली. सफारीसाठी या व्याघ्रप्रकल्पात प्रवेश करणारे पहिले आम्हीच होतो. आमच्यासोबत असलेल्या पर्यटक मार्गदर्शकाने नर वाघाच्या पाऊलखुणा पाहिल्या आणि तो आम्हाला म्हणाला, कदाचित हा नवीन नर वाघ असावा. कारण ‘छोटा मटका’ या वाघाने व्याघ्रप्रकल्पाबाहेर एक शिकार केली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तो व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना दिसून आला नाही. त्यामुळे आम्ही इतर वाघांचा मागोवा घेण्याचे ठरवले. मात्र, चिखलाचा रस्ता असल्यामुळे आमच्या वाहन चालकाने वाहन चिखलात फसण्याच्या भीतीने दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. वाहनचालकाने वाहन वळवले आणि आमचे वाहन समोर जात असतानाच पर्यटक मार्गदर्शकाने वाहन थांबवायला सांगितले. तो म्हणाला, ‘सर.. वाघ..!’ आणि त्या खालच्या रस्त्यावरून एक मोठा नर वाघ कोणताही अलार्म न देता पर्यटन रस्त्यावर आला. (एरवी, वाघाची चाहूल लागली तर माकड, हरिण हे आपापल्या सहकाऱ्यांना एक विशिष्ट आवाज काढून ‘अलर्ट’ करतात. त्यामुळे पर्यटकांना देखील आजूबाजूला वाघ असल्याचे कळते.
हे ही वाचा… योगेंद्र यादव यांच्या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; धक्काबुक्की, घोषणाबाजी अन् खुर्च्यांची तोडफोड
हे ही वाचा… नागपूर : फडणवीस सहाव्यांदा; बावनकुळे, खोपडे चौथ्यांदा अन्…
‘छोटा मटका’ या वाघाने मात्र असे काहीही केले नाही. तो शांतपणे चालत होता. रस्त्यावर पर्यटकांची वाहने असताना देखील त्याला त्याची चिंता नव्हती. तो प्रदेश चिन्हांकित करत होता आणि त्याला नवीन नर वाघाची उपस्थिती असावी असा वास येत होता म्हणून तो वेगळ्या रस्त्याने वळतो. (वाघांना त्यांच्या अधिवास क्षेत्रात इतर वाघ असतील तर त्याचा सुगावा लागतो आणि आपल्या अधिकार क्षेत्रात ते इतर वाघांना सहन करत नाहीत). आम्ही त्याच्या मागे जात असताना ‘छोटा मटका’ एका नाल्यात शिरला आणि पर्यटक मार्गदर्शकाने सांगितल्याप्रमाणे ‘अर्जूना’च्या झाडाजवळ तो थांबला. पर्यटक मार्गदर्शक आम्हाला म्हणाला देखील की तो आता दोन पायांवर उभा राहून त्या झाडाच्या खोडावर नखाने ओरबाडेल. अगदी तेच घडले. ‘छोटा मटका’ ने त्याच्या उपस्थितीची खूण दर्शवत इतर वाघांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.