लोकसत्ता टीम
नागपूर : २००९ ते २०१९ या पंधरा वर्षात झालेल्या लोकसभेच्या तीन निवडणुकांमध्ये नागपुरात भाजपच्या मतांमध्ये दुपटीने वाढ झाली तर काँग्रेसच्या मतांमध्ये कधी वाढ तर कधी घट झाल्याचे दिसून येते. २०२४ मध्ये मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून ते आपला कौल कुणाच्या पारडयात टाकतात, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.
२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विलास मुत्तेमवार नागपूरमधून विजयी झाले होते. त्यांना ३,१५,१४८ मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत मुत्तेमवार हेच उमेदवार होते. त्यांना २००९ पेक्षा कमी म्हणजे ३,०२,९९१ मते मिळाली व ते पराभूत झाले. २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले होते. त्यांना ४,४४,३२७ मते मिळाली होती. ती २०१४ च्या तुलनेत एक लाख चाळीस हजारांहून अधिक तर २००९ च्या तुलनेत सव्वा लाखाने अधिक होती. याउलट भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये मात्र दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते. २००९ मध्ये भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांना २,९०,७४९ मते मिळाली होती. ते पराभूत झाले होते. २०१४ मध्ये नितीन गडकरी भाजपचे उमेदवार होते व त्यांना ५,८७,७८७ मते मिळाली व ते विजयी झाले. यावेळी भाजपच्या मतांमध्ये २००९ च्या तुलनेत २.९७ लाख मतांनी वाढ झाली होती.
आणखी वाचा-जे.पी. नड्डा यांचा दहा दिवसांत दुसऱ्यांदा नागपूर दौरा रद्द
२०१९ मध्ये पुन्हा गडकरी रिंगणात होते. त्यांना ६,६०,२२१ मते मिळाली व ते विजयी झाले. त्यांना मिळालेली मते ही २०१४ च्या तुलनेत ७२ हजाराने अधिक तर २००९ च्या तुलनेत तब्बल ३.६९ लाखांनी म्हणजे दुपटीहून अधिक होती. पंधरा वर्षात भाजपच्या मतांचा आलेख चढता असल्याचे आकडे दर्शवतात. बसपला २००९ मध्ये १,१८,७४१ मते मिळाली होती. २०१४ मध्ये यात घट होऊन ती ९६,४३३ झाली. २०१९ मध्ये बसपाला ३१,७२५ मते मिळाली होती
”२०१४ पासून केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या लोकहिताच्या योजना आणि देशभरात झालेली विकासकामे यामुळे भाजपच्या मतांच्या संख्येत वाढ झाली आहे.” -चंदन गोस्वामी, भाजप.
“२०१४ मध्ये संपूर्ण देशात मोदींची लाट होती. त्याचा परिणाम काँग्रेसच्या मतांवर होणे स्वाभाविक होते. २०१९ मध्ये मोदी लाटेची तीव्रता कमी होती. पण याही स्थितीत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसून येते.” -प्रफुल्ल गुडधे, काँग्रेस नेते.