नागपूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी सर्वात लक्षवेधी ठरलेल्या रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात केलेल बंड कायम आहे. मात्र उमरेडमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधातील शिवसेना (शिंदे) उमेदवार राजू पारवे यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे.
हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश बंग यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य उज्वला बोढारे यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे हिंगण्यातील राष्ट्रवादीतील बंड टळले. काटोल मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार चरणसिंह ठाकूर यांच्या विरुद्ध अजित पवार गटाचे सुबोध मोहिते यांनी अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी सोमवारी मागे घेतला.
हेही वाचा…सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
u
रामटेक विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मुळक यांची बंडखोरी राज्यात सर्वाधिक चर्चेला गेली. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांना प्रदेश काँग्रेसकडून विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले. ही लढत चुरशीची होणार आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल रिंगणात आहेत. येथे त्यांच्याच पक्षाचे नरेश धोपटे यांनी अर्ज भरला होता. पण त्यांनी माघार घेतली. उमरेडमध्ये राजू पारवे यांनी भाजप विरोधात केलेली बंडखोरी चर्चेत होती. त्यांच्याशी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारवे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर पारवे यांनी माघार घेतली.
हेही वाचा…प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सलील देशमुख यांच्या विरुद्ध युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार रिंगणात कायम आहे. महाविकास आघाडीतील हे बंड सलील देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या विरुद्ध काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर यांनी बंड केले आहे. ते हलबा समाज पुरस्कृत उमेदवार आहेत. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या विरोधात काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांनी तर भाजपचे या मतदारसंघातील उमेदवार व विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या उमेदवार आभा पांडे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. जिल्ह्यात महायुतीमध्येही बंड झाल्याचे यावरून दिसून येते. उमरेड मतदारसंघातून काँग्रेसचे उमदवार संजय मेश्राम यांच्या विरुद्ध काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद थुटे रिंगणात होते. ते काँग्रेस नेते सुनील केदार यांचे समर्थक मानले जात होते. त्यांच्या माघारीमुळे मेश्राम यांना दिलासा मिळाला.