वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने सहा गावांचा संपर्क तुटला तर सात मार्ग बंद झाले आहेत.

वणी तालुक्यात जीवितहानी, पशुधन हानी झाली नाही, मात्र शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने कवडशी, भुरकी, नवीन सावंगी, शेलू, चिंचोली, झोला, जुनाड, जुगाद या गावाचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे कवडशी मार्ग, शिवानी मार्ग, वरोरा, सावंगी, भुरकी, चिंचोली व जुगाद हे मार्ग बंद झाले आहेत. मारेगाव तालुक्यातही मंगळवारी पावसाने चांगलाच कहर केला. त्यातच बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे कोसारा, दापोरा, नवरगाव, पाटाळा, कुंभा हे मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

वर्धा नदीकाठावरील सावंगी, शिवणी, आपटी, दांडगाव, झगडारीठ, वनोजा, चिंचमंडळ, दापोरा, गोरज, कानडा, पारडी, चनोडा, मुक्टा गावांना पुराचा धोका असल्याने प्रशासन सतर्क आहे. इसापूर धरण ९६ टक्के भरलेले असून सध्या ६११ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे.

Story img Loader