नागपूर : राज्यात मोसमी पावसाच्या आगमनाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दोन आठवड्यात कदाचित मोसमी पाऊस राज्यात कोसळेल, पण विदर्भात मात्र तापमानाचे नवनवे रेकॉर्ड दररोज नोंदवले जात आहेत. नवतपाच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा आलेख वर चढत असताना, आता नवतपा सुरू झाल्यानंतर तो आणखी वेगाने वर जात आहे. यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळ्यात ४७.१ अंश सेल्सिअसची नोंद विदर्भातील ब्रम्हपूरी या शहरात झाली. तर नागपूर शहरातही ४५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
२५ मेपासून सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आणि विदर्भात नवतपाला सुरुवात झाली आहे. नवतपाच्या पहिल्याच तीन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली.तापमानाचा पारा ४४, ४५, ४६, ४७ अंश सेल्सिअस असा वाढतच गेला. आता तर प्रादेशिक हवामान खात्याने २९ मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला. त्यामुळे नवतपाचे पुढील दिवस वैदर्भियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. प्रादेशिक हवामान खात्याने आता विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ दिला आहे. चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती हे पाच जिल्हे तापमानाच्या रडारवर आहेत. या जिल्ह्यांना उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ खात्याने दिला आहे. त्यामुळे या दिवसात तापमानाचा पारा आणखी चढणार हे निश्चित.
पुढील काही दिवस तापमान आणखी वाढणार असल्याने गरज नसताना दुपारच्या वेळेस नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी ब्रह्मपुरीमध्ये ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवण्यात आले. तर नागपूरमध्ये ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपुरातील हे या मोसमातील उच्चांकी तापमान आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये सोमवारी कमाल तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला. विदर्भच नाही तर मराठवाड्यातही कमाल तापमानात वाढ होत आहे. आधी खानदेशात तापमानाचा पारा वाढला होता, तर आता मराठवाड्यातही तो वाढतच आहे.
हेही वाचा : संतापजनक : नवजात बाळाला नालीत फेकले; पुसदमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना…
४६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद येथे झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची मात्र चांगलाच त्रास होत आहे. सकाळी आठ वाजेनंतरच घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तर रात्री देखील वातावरण थंड होत नसून उन्हाच्या झळा जाणवत आहे. दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर आरोग्ययंत्रणा देखील सतर्क झाली आहे.