नागपूर : तामिळनाडू, केरळमध्ये सुरू असलेल्या पावसाचा परिणाम महाराष्ट्रवरही होत आहे. विदर्भातदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये एकादशीला ढग दाटून पौर्णिमेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्रीच्या तापमानात घट झाली असली तरी रात्री व पहाटे गारवा कायम आहे.
२३ व २४ नोव्हेंबरदरम्यान विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण, सिंधुदुर्ग, खानदेश, नाशिक, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काहीच जिल्हे या प्रभावात येणार आहेत. यात यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावतीत पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : जन्मजात मेंदूत संक्रमण असलेल्या बाळाला जीवदान; मेडिकलच्या डॉक्टरांना यश
हेही वाचा : तलाठी भरतीतील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल
२८ नोव्हेंबरपर्यंत पावसाळी वातावरण दूर होण्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज असून ते बांगलादेशकडे कुच करेल, असा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारी अंशतः कमी झालेल्या रात्रीच्या तापमानात बुधवारी अंशतः वाढ झाली. नागपुरात किमान तापमान १६.८ अंश नोंदविण्यात आले असून ते सरासरीपेक्षा २.३ अंशाने अधिक आहे. कमाल तापमानात अंशतः घट झाली असली तरी ते सरासरीपेक्षा अधिक आहे. इतर सर्व जिल्ह्यात दिवस- रात्रीचा पारा सरासरीच्या वर चढला आहे. तापमान वाढल्याचे थंडीचा प्रभावही कमी झाल्याचे दिसून येत आहे. केवळ मध्यरात्र ते पहाटे गारव्याचा अनुभव येत आहे.