नागपूर : विदर्भात अजूनही अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने हजारो हेक्टरवरील पिके नाहीशी झाली असतानाच आठवड्याच्या अखेरीस पुन्हा अवकाळीने विदर्भाला झोडपले. शनिवारी पहाटे नागपूरसह अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
शनिवारी पहाटेच्या सुमारास शहरात ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि थोड्याच वेळात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी आठ वाजेपर्यंत सुरूच होता.
हेही वाचा >>>अकोल्यात चुरशीची तिरंगी लढत
नागपुरात शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत १५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. अमरावती शहरात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शेतपिकांसह महावितरणलाही फटका बसला.
नांदेडलाही फटका
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून विजांच्या कडकटासह वादळी वारे आणि पावसाने थैमान घातले आहे. शुक्रवारी मध्यरात्री नांदेडसह , मुखेड, बिलोली, हदगाव, भोकर व देगलूर या तालुक्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड झाली. वीज खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला. फळपिकांसोबतच शिजवून वाळविण्यासाठी ठेवलेली हळद भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अनेक जिल्ह्यांत थैमान
●अमरावती शहरात २२.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सुमारे ५३ हजार ४०२ हेक्टरमधील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.
●यवतमाळ जिल्ह्यातही हीच परिस्थिती होती. तेथे ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी पहाटे चार वाजेपासून पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातले. गोंदिया, वर्धा, अकोला, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.