वर्धा : कमी पैशात घरगुती वस्तू देण्याचे आमिष दाखवत ३२ लाख रुपयांची फसवणूक करत एक दाम्पत्य पसार झाले आहे. स्वस्तात मिळते म्हणून माल घेणारे व नंतर डोक्यावर हात मारणारे चित्र सर्वत्र आढळून येते. याच मानसिकतेचा फायदा घेत प्रशांत भाऊसाहेब निन्नावने व त्याची पत्नी ममता यांनी मिळून फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी स्थानिक बॅचलर रोडवरील शशांक शर्मा यांच्या घरी किरायाने संसार थाटला. तिथेच स्मार्टडील नावाची कंपनी सुरू केली.

कंपनीच्या माध्यमातून घरगुती फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू, फ्लॅट, कार तसेच इतर गृहपयोगी साहित्य कमी किंमतीत देण्याची स्किम सुरू केली. ग्राहकांना स्किम पटवून देण्यासाठी सपना कळमकर, नीता लक्षणे, योगिता सलामे, माया महल्ले तसेच अन्य काहींची सेल्समन म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यांना नियुक्तीपत्र दिले नव्हते. कंपनीची दहा हजार रुपयांची वस्तू केवळ पाच हजार रुपयांत मिळत असल्याचा बनाव सेल्सगर्लकडून केला जायचा. २४ तासांत पैसे भरल्यास अपेक्षित वस्तू २१ दिवसांत देणार असल्याचा दावा केला जात होता.

हेही वाचा : वंचितमुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलणार ? भाजपपुढे आव्हान

इच्छुक ग्राहकाने तयारी दाखविल्यास त्याचा फोटो घेतला जात असे. नंतर सेल्समनच्या खात्यावर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पैसे टाकण्यास सांगितल्या जात होते. याच माध्यमातून आशिष भागोराव पराते आणि अन्य ग्राहकांना ३१ लाख १४ हजार रुपयाने गंडविण्यात आले. ही रक्कम आरोपींनी स्वतःच्या खात्यात वळती केली होती. ही रक्कम घेऊन पती पत्नी पसार झाले. एकाही ग्राहकास एक सुद्धा वस्तू मिळाली नाही. ही आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलीसांकडे दाखल झाली असून पोलीसांनी विविध ग्राहकांचे जबाब नोंदवून घेणे सुरू केले आहे. कंपनी कार्यालयाची झडती घेण्यात आली आहे.

Story img Loader