वर्धा : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा येथे आयोजित सभेत बोलताना व्यापारीवर्गास सावध राहण्याचा इशारा दिला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजकीय नेते, उद्योगपती यांच्यावर विविध कारवाया झाल्या, त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. राजकीय नेते नाईलाज म्हणून भाजपात गेले. कारण, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबास तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली होती. कुटुंबाचा छळ होऊ नये म्हणून या नेत्यांना पक्ष सोडावा लागला. आता व्यापारीवर्गावर ही वेळ येणार आहे. कारण, एखाद्यास मानवी रक्ताची चटक लागली की तो कोणालाच सोडत नाही. उद्योगपती, नेते यांच्यासाठी तुम्ही-आम्ही होतो. पण व्यापारीवर्गाच्या बचावसाठी जनताच राहणार नाही. मोदी पुन्हा सत्तेवर येऊ नये म्हणून तुम्ही विरोधात मतदान केले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
दिल्लीत आंदोलन करताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. मात्र ए. राजा, कानिमोझी हे न्यायालयात निर्दोष सुटले. कारण न्यायालयात पुरावेच सादर झाले नाही. न्यायाधीश म्हणाले होते की, मी रोज पुरावे सादर करण्याची वाट पाहात होतो. पण ते न आल्याने निर्दोष सोडावे लागले. हा निर्णय २०१६ मध्ये आला. त्यावेळी मोदी सरकार होते. ‘ना खाऊंगा, ना खाणे दूंगा’ म्हणणाऱ्याने पुरावे का सादर केले नाहीत, याचे उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सध्या शेतकरी, कामगार, बेरोजगार यांच्यावर चर्चाच होत नाही. हे ‘आम’ जनतेचे सरकार नाही. ३७० कलम रद्द झाल्याचा आनंद व्यक्त होतो. पण अद्याप जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका का नाही, याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे. तेथील वर्तमान स्थिती लपून ठेवल्या जात आहे. विश्वगुरू होण्याआधी गल्लीगुरू होऊन दाखवावे, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. जाती-धर्मास प्राधान्य देऊ नका, आपल्याला संविधान वाचवायचे असल्याने मतदान विचारपूर्वक करा, असे आवाहनही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. व्यासपीठावर वंचित नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.