वर्धा : सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. आज सेलू येथील यशवंत शाळेच्या केंद्रातून हिंदीचा पेपर फुटल्याची चर्चा झाल्याने एकच खळबळ उडाली. अर्ध्या तासातच पेपर बाहेर आल्याचे म्हटले जात आहे. मात्र शाळेने हे वृत्त निखलास खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले.
मुख्याध्यापक अविनाश देशमुख म्हणाले की शिक्षण मंडळाने यां बाबत खुलासा मागितला. मात्र तसे काहीच घडले नसल्याचे आम्ही मंडळास लेखी कळवित आहोत. यां केंद्रावर हिंदीचे २१७ विद्यार्थी बसले आहेत. त्या सर्वांच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्यात.
हेही वाचा…भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, वृद्ध महिला ठार; नागपुरातील घटना
अर्ध्या तासात एकही विद्यार्थी बाहेर पडला नाही. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका अर्धा तास वर्गात ठेवून परत घेण्यात आल्या. त्यामुळे पेपर फुटला हा दावा कश्याच्या आधारे केला जातो, हे कळायला मार्ग नाही. उलट दोन दिवसापूर्वी उपशिक्षणाधिकारी केंद्र तपासून गेले. त्यांनी केंद्र उत्तम चालले असल्याचा शेरा दिला आहे. आम्ही सर्व माहिती मंडळास कळवित आहोत, असे स्पष्टीकरण मुख्याध्यापक देशमुख यांनी दिले. शिक्षणाधिकारी जगताप यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही.