वर्धा : खडतर प्रशिक्षणानंतर येथील अथर्व संजय देशमुख यास सब लेफ्टनंट या पदावर नियुक्ती मिळाली आहे. स्थानिक आलोडी परिसरातील रहिवासी असलेल्या अथर्वचे नौसेनेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शाळेत शिकत असतांनाच त्याने हे ध्येय ठेवले होते. नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने संभाजी नगर येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे दोन वर्षाचे पूर्व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर खडकवासला येथे संरक्षण प्रबोधीनीत तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. कसोटी घेणारे हे प्रशिक्षण असल्याचे तो सांगतो. या प्रशिक्षणानंतर केरळातील ईझीमला येथे एक वर्षाचे प्रशिक्षण झाले. त्यानंतर आता त्याला नौसेनेत सब लेफ्टनंट या पदावर नियूक्ती मिळाली आहे.
हेही वाचा : जगातील ९२ टक्के लोकसंख्या अतिसूक्ष्म धूलिकणांनी त्रस्त; संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणविषयक अहवालातील नोंद
येत्या काही दिवसातच तो विशाखापटटणम येथे रूजू होणार आहे. आपल्यापरीने सर्व ते योगदान देत देशसेवेला वाहून घेण्याचा पण त्याने केला आहे. अथर्वचे वडिल संचार निगममध्ये कार्यरत असून आई गृहिनी आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आईवडिल तसेच त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे नितीन व सविता देशमुख यांना देतो.