वर्धा : आपल्या वऱ्हाडी बोलीने राज्यात परिचित झालेले खदखद मास्तर म्हणून ओळखल्या जाणारे नितेश कराळे यांचे ग्रहमान काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. करोना काळात ते प्रसिद्धीच्या उंचीवर होते. त्याच काळात त्यांनी ऑनलाईन खासगी शिकवणी वर्ग सुरू करीत चांगलीच लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर लाखो फॅन्स त्यांना मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मग त्यांनी राजकीय वाट चोखाळली. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि नंतर शरद पवार यांच्याकडे ते थांबले. मात्र लक्ष वेधून घेतांना कुठे तरी थांबले पाहिजे, हे ते विसरले. पंतप्रधान असो की अन्य मान्यवर बेच्छूट टीका करणे सुरू करीत त्याचे ते समर्थनही करू लागले. यामुळे काही वर्ग संतप्त होताच. त्यानंतर कुठेही सार्वजनिक स्थळी मलाच काय ती जगाची चिंता म्हणून वाद घालायला लागल्याची चर्चा त्यांच्याबद्दल होत गेली.

हेही वाचा : भंडारा : नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द, शिवीगाळ; व्हायरल ऑडियो क्लिपने खळबळ

मास्तरचं काही खरं नाही, असे सूर उमटत असतानाच ही घटना घडली. मतदानाच्या दिवशी ते आपल्या मांडवा गावातून निघाल्यावर पुढे उमरी गावात थांबले. या ठिकाणी त्यांनी सवयीप्रमाणे, ए पोट्ट्या, असा आवाज देत एकास बोलावून घेतले.

बूथवर गर्दी कशी म्हणून विचारणा करीत गाडीतून उतरले. आणि मग वाद सूरू झाला. नियमबाह्य काम होत असल्याचे त्यांनी भाजप बूथवर आरोप केले. यातच मग माजी सरपंच सचिन खोसे धावून आले. त्यांनी नाक कशाला खूपसता विचारात कराळेना चोपणे सूरू केले. लगेच काही धावून आल्याने ते बचावले.

मात्र ही घटना व्हायरल झाल्याने चर्चेत आली. दोन्ही गटांनी सावंगी पोलिसांत तक्रार दिल्यावर खोसे गट व गुरुजींवर विविध गुन्हे दाखल झाले. आपली काहीच चूक नसल्याचा दावा दुसऱ्या दिवशी गुरुजींनी मग पत्रकारांना सांगितले. ढसाढसा रडलेही. भाजप नेत्यावर कारवाईची मागणी पण केली.

हेही वाचा : धक्कादायक अन् धोकादायकही, सायबर गुन्हेगार बनवताहेत कंपन्यांचे बनावट संकेतस्थळ!

नंतरच्या दिवशी मग माजी महापौर असलेल्या भाजप नेत्या मायाताई इवनाथे यांनी पत्रकार परिषद घेत गुरुजींवर तोफ डागली. पूर्वी भांडे वाटप प्रकरणात अमोल कन्नाके व या घटनेत श्रीमती कोकाटे यांनी पोलीस तक्रार केली आहे. मात्र गुरुजींवर अद्याप ऍट्रॉसिटी ऍक्टखाली कारवाई झाली नसल्याचे इवनाथे यांनी नमूद केले आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या कराळे गुरुजींनी उमरी येथे बूथवर प्रवेश केला. स्टार प्रचारकांना असे मतदान दिवशी बूथवर जाता येत नसल्याचे नमूद करीत कारवाई करण्याची मागणी झाली आहे. आता इतके काही करून पदरात मते पण पडली नाहीतच. याच उमरी गावात गुरुजींच्या आघाडीच्या उमेदवारास चारशे तर युतीच्या उमेदवारास बाराशेवार मते पडल्याची आकडेवारी आहे. गुरुजी भांडून आले पण मतं गमावून बसल्याची गावात चर्चा आहे. आता तरी गुरुजी थांबणार का, असा सवाल सोशल मीडियावर विचारल्या जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha bjp demand strict action against nitesh karale master for violation of model code of conduct after beaten up pmd 64 css