वर्धा: मनात कडवट पण ओठात गोडवा. मुहमे राम, बगलमे छुरी, असे वर्तन साधारणपणे राजकीय नेत्यांबाबत केल्या जात असते. पक्षातील राजकीय शत्रूत्व उघड प्रकट केल्या जात नाही पण संधी मिळाली की काटा काढण्याचा प्रकार सर्वच राजकीय पक्षातील गटबाजीत दिसणे नवे नाही. आता आर्वीचेच बघता येईल.
भाजपचे माजी झालेले दादाराव केचे आता काही दिवसापूर्वीच आमदार झाले. त्यांची तिकीट कापून उमेदवारी खेचणारे सुमित वानखेडे हे विधानसभेत तर केचे विधानपरिषदेत पोहचले. आर्वीत भाजपचेच हे दोन आमदार. दादाराव यांनी फडकविलेला बंडाचा झेंडा देशात गाजला होता. पण आमदारकीचे आश्वासन मिळाले अन केचे शांत झाले. पण मनातील शल्य काही गेले नाही. वानखेडे यांच्या प्रचारात शेवटच्या दोन दिवसात त्यांनी वानखेडे विरोधात प्रचार केल्याचा जाहीर आरोप झाला होता. पण आता निवळले. गत दोन वर्षात तर वानखेडे व केचे यांच्यातील चूरस गाजली होती. लोकसभा निवडणुकीत तर आर्वीत दोन प्रचार कार्यालय असण्याची बाब राज्यात एकमेव ठरली होती.
असे वानखेडे – केचे राजकीय वैर सर्वश्रुत असतांना रविवारी दोघे एकत्र आल्याचे, एकत्र बसल्याचे, एकत्रित प्रवास करीत एकमुखी हसल्याचे पाहायला मिळाले. हा गत चार वर्षातील दुर्मिळ क्षण लोकांना पाहायला मिळाला. निमित्त होते ते नव्या बसगाडयांच्या लोकार्पण सोहळ्याचे. राज्य परिवहन मंडळाच्या आर्वी आगारात ५ नवीन बसेस आमदार वानखेडे यांच्या प्रयत्नाने दाखल झाल्या. त्यावेळी वानखेडे व केचे यांनी मिळून हा सोहळा पार पाडला.
यावेळी बोलतांना आ. वानखेडे म्हणाले की आर्वी आगारात पुन्हा पाच व तळेगावला पाच बसेस उपलब्ध करून देणार. या नव्या गाड्या बघण्यासाठी मोठ्या संख्येत लोकं उपस्थित होते. त्यांना केचे व वानखेडे या दोन भाजप आमदारांचे एकत्र येणे धक्कादायी ठरले. आता नांदा सुखाने, असेच भाव भाजप कार्यकर्त्यामध्ये दिसून आल्याची चर्चा झाली. त्यांच्याच आग्रहाने दोन्ही आमदारांनी मग नव्या बसमध्ये बसून थोडा प्रवास पण केला. सेल्फी झाली. आणि हे दृष्य पुढेही दिसावे, अशी अपेक्षा मनोमन व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रशांत वानखेडे, जगन गाठे, विजय वाजपेयी, राजेश सोळंके, अविनाश टाके, बाळासाहेब गुजरकर, अश्विन शेंडे, सोनटक्के, सूर्यप्रकाश भत्तड, प्रशांत सव्वालाखे तसेच एस. टी. चे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, प्रतापसिंग राठोड, स्वाती तांबे, आशिष मेश्राम, सुधीर कांबळे, प्रविष्ट काळमेघ, सुरत बागडे व रवी गणेशकर उपस्थित होते.