वर्धा : हिंदुत्ववादी संस्कृती अभिमानाने मिरविणाऱ्या भाजपच्या नेत्यांचे प्रत्येक कार्य संस्कृतीनुसार चालत असल्याचे चित्र नवे नाही. खासगीच नव्हे तर त्यांच्या उपस्थितील सार्वजनिक कार्यही परंपरेला धरून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियोजीत सभा १९ एप्रिलला दुपारी पाच वाजता निश्चित झाली आहे. आर्वी की तळेगाव असा वाद होता. आमदार दादाराव केचे यांनी आर्वीतच सभा घेण्याचा हट्ट वरिष्ठांच्या बैठकीत मागे घेतला आणि पुढील कार्य सुरू झाले. सभेचे स्थळ तळेगाव येथील ४० एकर परिसरातील जागा येथे आहे.
हेही वाचा : नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचाही वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा…
प्रशासन व सुरक्षा व्यवस्थेने पुढील हालचाली सुरू करण्यापूर्वी सभास्थळावरील मोदींचे भाषण होणाऱ्या व्यासपिठाच्या जागेचे पूजन करण्याचे निश्चित झाले. आजचा मुहूर्त पाहून पुरोहिताच्या मार्गदर्शनात पूजनाची तयारी झाली. पूजा करण्याचा मान अर्थात आमदार केचेंना मिळाला. कलशपूजनसह सर्व विधी यथासांग पार पडले. यावेळी संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, उमेदवार रामदास तडस, क्षेत्रप्रमुख सुमीत वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट तसेच स्थानीक नेतेमंडळी उपस्थित होती. ही सभा ऐतिहासीक अशी व्हावी म्हणून प्रार्थना झाली.