वर्धा : पारंपरिक पद्धतीने निवडणुकीचा माहोल नको, तर नियोजन ठेवून काम करण्याचा सल्ला वरिष्ठ पातळीवरून भाजप गोटात झिरपला आहे. म्हणून बूथ, पन्ना प्रमुख या पातळीवर भाजप उमेदवाराचा प्रचार आटोपलापण आहे. सभा, रॅली, स्टार प्रचारक या बाबी दूर असल्याचे प्रचार नियोजक सुमित वानखेडे सांगतात. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान पंचायत समिती अंतर्गत सात गाव मिळून एक सभा झाली. त्यात प्रत्येक गावातील किमान २५ कार्यकर्ते हजर होते. तरच शहरात दोन प्रभाग मिळून एक सभा घेण्यात आली. आता जिल्हा परिषद प्रभाग पातळीवार सभा नियोजन आहे. या ठिकाणी उमेदवार नसतोच.
हेही वाचा : ईव्हीएम वापरताना माहिती कायद्याचे उल्लंघन होते म्हणून बॅलेट पेपरने निवडणूक घ्या, उच्च न्यायालयात याचिका
कमळ चिन्हाचे झेंडे व बिल्ले वाटप केल्या जाते. हे साहित्य केंद्रीय पातळीवारून येऊन पोहचले. तर स्थानिक स्तरावर पत्रक छापून झाली.. गाड्यांचा धुरळा उडवीत भाजपचा प्रचार सूरू असल्याचे कुठेच दिसणार नाही, असे एका संघटन पदाधिकाऱ्याने नमूद केले. आता १५ एप्रिल ते पुढे वेगळे प्रचार नियोजन भाजपकडून होणार. दोन दिवसापासून आमदार मंडळी कामास लावण्यात आली आहे. ते पण मोठ्या सभा न घेता कॉर्नर मिटिंग व पदयात्रा घेणार. कार्यकर्त्यांना जीप गाड्या देऊन प्रचारास जुंपण्याचा प्रकार भाजप कडून हद्दपार करण्यात आला आहे. स्लो बट स्टेडी असे प्रचार तंत्र ठेवण्यात आले आहे. शेवटच्या तीन दिवसात बूथ पातळीवार संबंधित कार्यकर्ते लक्ष केंद्रित करणार. इतरत्र फिरण्यास त्यांना पूर्णपणे मज्जाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.