वर्धा : शाळेत पोषण आहाराचे काम करणाऱ्या स्वयंपाकी तसेच मदतनीस यांची कामे शासनाने निश्चित केली असून स्वयंपाकासह आठ जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार देणारी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना लागू आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती स्वयंपाकी व मदतनीस यांची नियूक्ती करते. केंद्र व राज्य शासन मिळून दर महिन्यास अडीच हजार रूपये मानधन दिल्या जाते. या दोन्ही कर्मचाऱ्यांना दिलेले काम पार पाडावे लागते. त्यात शाळा व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याची बाब नमूद आहे. मात्र हे काम योजनेशी संबंधीत कामकाजाखेरीज असल्याने कामगार संघटना त्याबाबत नाराजी व्यक्त करीत होत्या. तशी निवेदने शासनास देण्यात आली.
योजनेखेरीज अन्य कामे न देण्याची व या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून विनाचौकशी कमी न करण्याची मागणी सातत्याने होते. त्याची दखल घेत शासनाने आठ जबाबदाऱ्या पक्क्या केल्या आहे. तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामाविषयी काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांची बाजू समजून घेण्याची शासनाने सूचना केली आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील कारवाई करण्याचेही सूचीत आहे.
हेही वाचा : नागपूर हादरले! घरमालकाचा भाडेकरू विवाहितेवर बलात्कार
निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या :
१. पाककृतीनुसार ठरलेल्या वेळेत पोषण आहार शिजविणे.
२. तांदूळ तसेच अन्य धान्याच्या मालाची सफाई करणे.
३. विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहार वाटप.
४. आहार सेवन झाल्यानंतर जेवणाच्या जाग्यासह स्वयंपाकगृहाची सफाई व उर्वरीत अन्नाची विल्हेवाट.
५. आहाराच्या भांड्यांची तसेच ताटांची स्वच्छता.
६. पिण्याचे पाणी भरून विद्यार्थ्यांना वाटप करणे.
७. शाळेतील परसबाग निर्मिती व देखभालीसाठी सहकार्य.
८. आहारात वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे.