वर्धा : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत पळवून लावण्याचे व पुढे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात अश्या घटना उजेडात येत आहेत. पोलीसांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग खास अश्या गैर कृत्याच्या तपासात अग्रेसर असतो. घडले असे की एक वर्षापासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. मात्र कुटुंबाने तिचे अपहरण झाल्याची तक्रार केल्याने प्रकरण गंभीर ठरले. सिंदी मेघे येथील राहणाऱ्या वृषाल उर्फ ऋषी राजेश मानकर या सव्वीस वर्षीय युवकाने सदर मुलीस प्रेमाच्या आणाभाका देत जाळ्यात ओढले. २६ जानेवारी २०२३ रोजी पीडिता शाळेत जायला निघाली होती. याच वेळी आरोपीने डाव साधला.
हेही वाचा : सावधान! पशुधनाला ‘लाळ खुरकत’ विषाणुजन्य रोगाचा धोका, दूध उत्पादनावर परिणामाची शक्यता
तिला फूस लावून पळवून नेले. दुसऱ्याच दिवशी मुलीच्या आईवडिलांनी रामनगर पोलीसांकडे तक्रार नोंदविली. तब्बल एक वर्ष लोटले. मात्र दोघांचाही छडा लागत नसल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक चमुकडे सोपविण्यात आले. आता ९ जानेवारीला या चमूने कसून तपास सुरू केल्यावर बावीस दिवसांनी शोध लागला. आरोपी पूणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी हे गाव गाठून आरोपीस ताब्यात घेतले. तो गत एक वर्षापासून भाड्याचे घर घेऊन निवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला पोलीस कोठडीत डांबण्यात आले तर मुलीस आईवडिलांकडे सोपविण्यात आले. तपासात मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे दिसून आले. आरोपी ऋषीवर गुन्हे दाखल झाले आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड , उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या मार्गदर्शनात निरंजन वर्भे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख, अनुप कावळे यांच्या चमूने कारवाई फत्ते केली.