वर्धा : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढणे सुरू झाल्याचे पहिले चिन्ह म्हणजे उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या रॅली, असे म्हटल्या जाते. ही रॅली शक्ती प्रदर्शन करणारी असावी असा प्रमुख पक्षांचा हेतू असतो. म्हणून मग गर्दी जमविण्याचे सर्व ते सोपस्कार पार पाडले जातात. इव्हेंट प्रिय भाजप यात आघाडीवर राहण्याचे नेहमीचे चित्र मात्र दिसलें नाही. हजारभर लोकं, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मिळून दिसलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.
या रॅलीत देवेंद्र फडणवीस सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वेळेवर त्यांनी सहभाग टाळला, असे ऐकायला मिळाले. त्यामुळे उमेदवार रामदास तडस हेच स्टार ठरले. तर प्रचारक म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, रामदास आंबटकर, डॉ. अनिल बोन्डे, प्रताप अडसड, सुनील गफाट, राजेश बकाने हे उपस्थित राहिले. रॅली निघाली तेव्हा आमदार कुणावार हे रस्त्यालगत उभ्या लोकांना चला, चला, करीत विनवणी करीत असल्याची बाब पण हसत हसत चर्चित झाली.
हेही वाचा…मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा शिंदे गटाच्या मतदारसंघात
याचे प्रमुख कारण म्हणजे याच स्थळावरून काल मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांची रॅली निघाली होती. त्यात सहभागी लोकं, दिसणारा उत्साह, नारेबाजी यामुळे शहरात ही रॅली चर्चेचा विषय झाली होती. त्याचीच तुलना आज या परिसरातील नागरिक करीत होते. आज मजा नही आया, असे स्वर उमटले. हे असे का घडले, या प्रश्नावर बोलतांना भाजपचे लोकसभा क्षेत्र प्रचारप्रमुख सुमित वानखेडे म्हणाले की आमचे एवढेच नियोजन ठरले होते. शक्ती प्रदर्शन प्रकार नव्हता. पुढे आमचे मल्टीपल इव्हेंट आहेतच. आणि मुख्य म्हणजे आम्ही ही लढाई बूथ पातळीवर लढणार आहोत. गर्दी, मोठ्या सभा असे काही प्रकार नाहीत असा खुलासा त्यांनी केला. भाजपचे हे असे प्रचारतंत्र असले तरी सर्व सामान्य जनतेने मात्र रॅली फसली, असाच चर्चेचा सूर काढल्याचे पाहायला मिळाले.