वर्धा : वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा झाली. यासाठी वर्धा शहरालगत जागेचे प्रस्ताव पण पाठविण्यात आले. पण वर्धा नाही तर हिंगणघाट येथेच हे महाविद्यालय व्हावे म्हणून लढा सुरू झाला. हिंगणघाट येथे तर सर्वपक्षीय समिती स्थापन होत आंदोलन सुरूच आहे. यात आपण मागे पडायला नको म्हणून मग आमदार समीर कुणावार यांनीही उडी घेतली. चालू अधिवेशनात तर त्यांनी मागणीसाठी पायरीवरच ठिय्या दिला. हे कमी की काय त्यांनी महाविद्यालय द्या नाही तर राजीनामा घ्या, असे अस्रच बाहेर काढले. इकडे वर्ध्यात संभाजी ब्रिगेडने वर्ध्यातच व्हावे म्हणून आंदोलनास आरंभ केला आहे. यात आता भर आर्वीची पडली आहे.
हेही वाचा : नागपूर हादरले! घरमालकाचा भाडेकरू विवाहितेवर बलात्कार
एक महिन्यापूर्वीच येथे तीनशे खाटा क्षमतेचे रुग्णालय मंजूर झाले. ती सुरवात होती. हे महाविद्यालय आर्वीलगत तळेगाव येथे स्थापन व्हावे म्हणून सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. हेच गाव सोयीचे व गरजेचे. महामार्ग असल्याने मोठे अपघात होतात. पण चांगल्या उपचाराची सोय नाही. लगत मोर्शी, वरूड व अन्य मोठा ग्रामीण परिसर आहे.त्यांना उपचारासाठी अमरावती, नागपूर पेक्षा तळेगाव सोयीचे पडते, असा युक्तिवाद करण्यात आला.प्राचार्य डॉ.श्याम भुतडा म्हणाले की जिल्ह्यात हा सर्वात दुर्लक्षित भाग आहे. इथेच झाले पाहिजे. डॉ.रीपल राणे, ज्येष्ठ पत्रकार विजय अजमिरे, डॉ.अरुण पावडे तसेच रेडक्रॉस, मदत, लॉयांस, भारत सेवक समाज, रोटरी, मातृ सेवा संघ, पत्रकार संघटना आदी या भेटीत सहभागी झाले होते.