वर्धा : उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपसमितीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी वादाचे समतोल उत्तर साधण्याचा प्रयत्न केला आहे. वर्ध्यात हे वैद्यकीय महाविद्यालय होणार नाही. कारण येथील सामान्य रुग्णालय आयुर्विज्ञान आयोगाचे निकष पूर्ण करीत नसून सध्या इथे दोन महाविद्यालय आधीच कार्यरत आहेत. झालेल्या चर्चेनुसार हिंगणघाट हे योग्य ठिकाण असून त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी योग्य जागा वर्धा जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी, असा निर्णय झाला. या ठिकाणी प्रथम ४३० खाटांचे रुग्णालय बांधल्या जाईल. त्यानंतर दोन वर्षांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज करता येईल.
हेही वाचा : “मुंबईत मुली रात्री १२ वाजता…”, महिला सुरक्षेसंदर्भात फडणवीसांचं विधानसभेतील विधान चर्चेत!
आर्वी, आष्टी, तळेगाव या परिसरात अपुऱ्या आरोग्य सुविधा आहेत. नव्याने मान्यता दिलेल्या रुग्णालयाच्या उभारणीस प्रथम गती देण्यात येईल. आयोगाच्या निकषांची पूर्तता होईल. जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या सामंजस्य करारानुसार पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास शासनातर्फे प्राधान्य मिळेल, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून निवेदन सादर झाले.