वर्धा : उतारवयात पैश्याची काठी मजबूत असावी, हेच खरे. वृद्धाश्रम नको आणि स्वाभिमानी मनाने जगायचे तर हक्काची पुंजी हवी. तीच हरविली तर मग कठीणच. अज्ञात स्थळी ती पोलीसांच्या हाती लागली. दीड लाख रुपयाची पुंजी हाती आली. आणि पोलिसांना काय करावे तर त्याचा शोध घेणे सूरू केले. मग वृद्धच्या डोळ्यातील दुःखाश्रू निवळले आणि आनंदाश्रू ओघळले.

अशीच माणुसकीचे प्रत्यन्तर देणारी सत्यकथा. झाले असे की हिंगणघाट शहर पोलीस रात्रीची गस्त घालण्यास फिरतीवर होते. कारण शहरात चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढू लागले होते. पोलीस हवालदार नरेंद्र डहाके व आकाश कांबळे तसेच वाहनचालक रवी पांडे मिळून रात्रीच्या पेट्रोलिंगवर होते. एफ बी टाउन परिसरात त्यांची गाडी असतांना रस्त्यालगत त्यांना एका झाडाजवळ दोन काळ्या रंगाच्या बॅग आढळून आल्यात. ही बाब संशयास्पद वाटली. चोऱ्या होत असल्याने चोरट्यानी या बॅगा चोरी करीत लपवून ठेवल्या असल्याचा संशय आला. पोलिसांची गाडी पाहून या बॅगा इथेच लपवून चोरटे पळून गेल्याची शंका आली. या बॅगा तपासून त्या ताब्यात घेण्याचे ठरले. तपासणी केल्यावर त्यात चक्क रोख रक्कम सापडली. मोजल्यावर ती रक्कम १ लाख ७५ हजार रुपये एव्हढी भरली. तसेच एक चांदीचा शिक्का पण होता. हे एव्हढे पैसे कोण सोडून गेला असावे, असा प्रश्न पडला. नक्कीच हा चोरीचा मामला, असा ग्रह झाला. बॅग उलट सुलट करण्यात आली तेव्हा त्यात एक बँकेचे पासबुक दिसून आले.

पासबुकची पाहणी केली. त्यावर असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्यात आला. तेव्हा ही बॅग देवळी तालुक्यातील दापोरी येथील त्र्यंबकराव कामनापुरे यांची असल्याची खात्री पटली. त्याच परिसरात चौकशी सूरू केली. तेव्हा हे कामनापुरे आजोबा घराबाहेर आले. या तर आपल्याच बॅगा म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. आदल्या दिवशी ते आपल्या पत्नीसह आपल्या दापोरी गावावरून हिंगणघाटसाठी निघाले होते. वाटेत थांबले असतांना या बॅगा चुकून राहून गेल्या. बॅगेत शेती मक्त्याने लावून दिल्यावर आलेले पैसे होते. ही पुंजी वर्षभराच्या उदरनिर्वाहची होती. ती सापडल्याने पंच्याहत्तरी पार या वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पोलीस दादांचे किती आभार मानावे, ते सुचेनासे झाल्याची त्यांची स्थिती झाल्याचे येथील समाजसेवी रवी येणोरकर म्हणाले.पैसे आता कायमचे गमावून बसल्याच्या चिंतेत असतांना ते आकस्मिक हाती पडले होते. पोलिसांचा हा प्रामाणिकपणा पाहून कामनापुरे दाम्पत्याने त्यांचे मनोमन आभार मानले. तसेच कुटुंबाने पण हवालदार नरेंद्र डहाके, आकाश कांबळे व चालक रवी पांडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात या कृतीची चर्चा होत आहे.

Story img Loader