वर्धा: जुलै महिन्यापासून पावसाने अखंडित हजेरी लावली आहे. परिणामी लहान मोठी सर्वच धरणं तुडुंब भरली असून सातत्याने पाण्याचा विसर्ग सूरू आहे. पाटबंधारे खात्याची परीक्षा घेणारा हा काळ असल्याचे म्हटल्या जात आहे. जून महिन्यात सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला. तर जुलै महिन्यात ५५५ मिमीची नोंद असून सरासरीच्या २०३ टक्के असे हे प्रमाण आहे. ऑगस्टमध्ये ६५ तर सप्टेंबरला ८० टक्क्याची पर्जन्य नोंद आहे. धाम, वणा व वर्धा नदीच्या पाण्याची ईशारा पातळी वाढतच असल्याची नोंद आहे.

नदीच्या धोकादायक पातळीमुळे निम्न वर्धा, धाम, पोथरा, पंचगंगा, डोंगरगाव मदन, मदन उन्नई, लाल नाला, कार, नांद, वडगाव, उर्ध वर्धा या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सतत सूरू आहे. त्यामुळे गावनाले तुडुंब असून दुर्घटना घडण्याचे प्रमाण सतत वाढू लागले आहे. या तीन महिन्यात ७ व्यक्ती पुरात वाहून गेल्या. दोन दिवसांनी त्यांचे मृतदेहच हाती लागलेत. गुरुवारी कारंजा येथे एक महिला वीज पडून मृत्यूमुखी पडली असून तिचा पती व मुलगा जखमी झालेत. पुलावरून पाणी वाहत असतांना गाडी नेल्याने पुलगाव येथे दोघे वाहून गेले. दोन दिवसापूर्वी समुद्रपूर तालुक्यात तिघे वाहून गेलेत. त्यापूर्वी कानगाव येथे आजोबा नातीचा मृत्यू पूल खचल्याने झाला.

हेही वाचा : मुनगंटीवार म्हणाले, “जागा वाटपाबाबत महायुतीत एकमत…”

दुसरीकडे शेतीचे नुकसान आहेच. शेताचे शेततळे झाल्याची स्थिती दिसून येते. किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे म्हणतात की दोन अडीच महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून लागू होणारी मदत त्वरित दिली पाहिजे. पंचनामे झाले म्हणतात. पण त्याची आकडेवारी वारंवार मागूनही जिल्हा प्रशासन देत नाही. सहा हजार रुपयाच्या वर मदत देता येते. वीज बिल माफ करणे अपेक्षित. रबी हंगाम येतो आहे. पण हाती काहीच नसल्याने शेतकरी रडवेला झाल्याची नोंद काकडे करतात. आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले की परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे खरेच. म्हणून त्वरित संपूर्ण पंचनामे करीत मदत देण्याची मागणी केली असून पाठपुरावा सूरू असल्याचे भोयर सांगतात. पण तूर्तास पुरस्थितीमुळे काही ठिकाणे धोक्याची ठरली आहे. पुरबळी लक्षात घेऊन बचाव पथकच्या तीन चमू तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे.